काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आझाद यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पक्षावर नाराज असल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> यंदाचा शिवसेना दसरा मेळावा कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा? परवानगीबद्दल फडणवीस स्पष्टच म्हणाले, “गृहमंत्री म्हणून…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आझाद काय म्हणाले?
आझाद यांनी गांधी कुटुंबावर थेट प्रहार केल्यामुळे सामंजस्याची शक्यता संपुष्टात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. ‘‘रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत,’’ अशी कठोर टीका आझाद यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी राजीनामापत्रात केली आहे. राहुल गांधी अधिकृत पक्षाध्यक्ष नसले तरी, त्यांच्या संमतीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेते सातत्याने करत आहेत. 

जी-२३ ची नाराजी
संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. या गटाचे म्होरके असलेले आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

पृथ्वाराज चव्हाण आझाद यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?
वर्षांनुवर्षे पक्षात काम केलेल्यांनी अशा पद्धतीने पक्षातून बाहेर पडावे लागते हे चुकीचेच आहे. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी माफक अपेक्षा गुलाम नबी आझाद काय किंवा कपिल सिब्बल यांच्यासह आम्ही २३ नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यात चुकीचे काहीच नव्हते, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी सर्वाची इच्छा होती व तशी मागणीही झाली होती. राहुल गांधी पद स्वीकारण्यास तयार नसल्यास अन्य कोणाची निवड व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा आहे . यातून पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा काहीच प्रयत्न नव्हता. केवळ पादुका ठेवून कोणी नेतृत्व करू नये, असंही चव्हाण म्हणाले.  

नक्की वाचा >> “गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”; राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी विधान

फडणवीस काय म्हणाले?
“गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेसचे नेते एकामागोमाग एक पक्ष सोडून चाललेत. पृथ्वीराज चव्हाणसुद्धा नाराज असल्याची स्थिती दिसत आहे सध्या” असं म्हणत नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद सुरु असताना फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. “काँग्रेसची परिस्थिती आता बुडत्या जहाजासारखी आहे. त्यामुळे अनेक लोक आता काँग्रेस सोडत आहेत. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर यापेक्षा जास्त बोलणं काही योग्य नाही,” असंही फडणवीस यांनी प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

जी-२३ गट कोण?
काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. जिल्हा स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत नेतृत्वबदल करावा लागेल. त्यासाठी संघटनात्मक निवडणुका घेतल्या पाहिजेत. पूर्ण वेळ कार्यरत राहणारे, कार्यकर्त्यांना भेटणारे नेतृत्व म्हणजेच पक्षाध्यक्ष असला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली. गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले. २३ बंडखोर नेत्यांनी ऑगस्ट २०२०मध्ये सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्व व संघटनेतील बदलासंदर्भातील मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान व बंडखोर असा वाद वाढत गेला.

‘जी-२३’मधील मूळ बंडखोरांमध्ये चव्हाणांचा समावेश
गुलाम नबी आझाद, कपिल सिबल, शशी थरूर, मनीष तिवारी, आनंद शर्मा, पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद, भूपेंद्र सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, एम. वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, अजय सिंह, राज बब्बर, अरविंद सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रताप सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आणि विवेक तन्खा या नेत्यांचा जी-२३ या मूळ गटात समावेश होता. त्यातील जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये तर, योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘जी-२३’ आता ‘जी-२१’ झाला आहे. आता आझाद यांनी पक्ष सोडल्याने हा गट ‘जी-२०’ झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghulam nabi azad resignation prithviraj chavan unhappy with congress devendra fadnavis reacts scsg