नव्वदच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी साहित्य-कला-सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांना जाहीर केलेल्या पुरस्कारांवर मोठी टीका झाली. ‘रमणा’ हा शब्द त्यातून पुढे आला. आता घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानेही येथील एका संस्थेने पुरस्कारांची खैरात केली आहे.
दि. ३ ते ५ एप्रिलदरम्यान पंजाबातील घुमान येथे होत असलेल्या साहित्य संमेलनानिमित्त नांदेड येथून भक्त नामदेव दिंडी निघणार आहे. येथील नान-साई फाउंडेशनच्या पुढाकारातून मंगळवारी (दि. ३१ मार्च) ही दिंडी अमृतसरला प्रयाण करणार आहे. तत्पूर्वी, या संस्थेने धार्मिक साहित्य, सहकार, पत्रकारिता, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी अलीकडेच ही माहिती दिली. घुमान संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, लेखक-पत्रकार अविनाश पायगुडे, गुरू नानक देव यांचे सोळावे वंशज बाबा सुखदेवसिंघ (बटाला), करणसिंघ बजाज (थायलंड) घुमानच्या गुरुद्वाराचे चिटणीस गुरुचरणसिंघ बावा, मराठा सेवासंघाचे अध्यक्ष कामाजी पवार, राजश्री हेमंत पाटील, अॅड. दिलीप ठाकूर, सहकार क्षेत्रातील डॉ. सुकेश झंर, राजेश्वर कल्याणकर, नांदेडचे लेखक डॉ. जगदीश कदम आदींचा पुरस्कारप्राप्त मानक ऱ्यांत समावेश आहे.
दि. ३ एप्रिलला अमृतसह ते घुमान शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर घुमानच्या संत नामदेव गुरुद्वारा परिसरातील सभागृहात या पुरस्कार वितरण होईल. या संबंधीच्या प्रसिद्धिपत्रकावर पुरस्काराचे स्वरूप जाहीर करण्यात आले नाही. एकंदर ३१ जणांना भक्त नामदेव जीवनगौरव व नानकसाई विशेष सन्मान दिला जाणार आहे. नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहिबचे मुख्य पुजारी संतबाबा नरेंद्रसिंघजी, तसेच संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या सहयोगाने पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याचे संयोजक पंढरीनाथ बोकारे यांनी कळविले आहे.
घुमान संमेलनात पुरस्कारांची खैरात
घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानेही येथील एका संस्थेने पुरस्कारांची खैरात केली आहे.
First published on: 29-03-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghuman sahitya sammelan award give freely