अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे संत नामदेवांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानचा सध्या गाजावाजा सुरू आहे. मात्र, संत नामदेवांची ‘नरसी’ वेगवेगळ्या कारणांनी उपेक्षितच राहिली. हिंगोली जिल्ह्य़ातील नरसीपर्यंत जाताना हाडे खिळखिळीच होतात. पोहोचल्यावर ना राहण्याची सोय, ना भोजनाची व्यवस्था. २९ वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग नामदेवाच्या जन्मगावी येणार, अशी बातमी आली होती, तेव्हापासून विकासासाठी निधी येतो, अर्धवट खर्च होतो. विकासाचे अर्धवट अवशेष कोठे कोठे दिसतात. बाकी नरसी उपेक्षितच!
संत नामदेवांचा जन्म सन १२७० मध्ये िहगोली जिल्ह्यातील नरसी येथे झाला. १३५० मध्ये त्यांनी समाधी घेतली. आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पताका खाद्यांवर घेऊन संत नामदेव पंजाबपर्यंत गेले. साहित्यिकांना पंजाबमधल्या घुमानचे भलते कौतुक. मात्र, नरसीचा उल्लेखही कोठे होत नसल्याची खंत हिंगोलीच्या साहित्य क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत आहेत. डॉ. ना.गो. नांदापूरकर, नरहर कुरूंदकर, तु. शं. कुलकर्णी, अलिकडच्या काळातील फ. मुं. िशदे, भ. म. परसावळे हे देखील हिंगोलीतलेच.
संत नामदेवांच्या या कर्मभूमीत अजून कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. वास्तविक, संत नामदेवांच्या समाधिस्थळांच्या विश्वस्तांकडे  ७ एकर ३१ गुंठे मालकीची जमीन आहे. या ठिकाणी दर एकादशीला मोठय़ा प्रमाणात भाविक संताच्या दर्शनाला येतात. इतकेच नाही, तर आषाढी, एकादशीच्या परतवारी निमित्ताने लाखो वारकरी संतांच्या दरबारी हजेरी लावतात. परंतु येथे वारकऱ्यांसाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांची गरसोय होते.
विकासाचे अर्धवट अवशेष
तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्तनिवास बांधण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९९ लाख ९७ हजार रुपये आले. २५ लाख खर्च झाले. त्याचे भग्नावशेष आता शिल्लक आहेत. १५ वर्षांपूर्वी भाविकांच्या सोयीसाठी ३६ लाख रुपये मिळाले होते. त्यातून १२ खोल्या बांधल्या गेल्या. तेथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे ३५ विद्यार्थी राहतात. पर्यटन विभागाने हिंगोली-रिसोड रस्त्यावर पर्यटन निवासही बांधले होते. त्याची अवस्था एवढी वाईट आहे, की कोणी तिकडे फिरकतच नाही. येणाऱ्या भक्तांसाठी साधी स्वच्छतागृहाची सोय सध्या उपलब्ध नाही.
‘नरसी हे गैरसोयींचे माहेरघर आहेच. मात्र, या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नामदेवाची गाथा तरी अभ्यासली जाणार आहे का? त्यांच्या साहित्यात अनेकांनी केलेली ‘घुसखोरी’ दूर करता येण्याइतपत काम तरी अभ्यासक करतील का, हा प्रश्न आहे. त्यांची गाथा अक्षर स्वरूपात उपलब्ध व्हायला हवी. या निमित्ताने परिसंवाद व्हायला हवे. नरसी येथील विकास होण्यासाठी आधी नामदेव समजावा लागेल. तशी सध्या स्थिती नाही. ना अभ्यासकांमध्ये ती भावना आहे, ना सरकारमध्ये.’ – साहित्यिक भ. म. परसावळे
 

Story img Loader