सहिष्णुतेच्या बाबतीत देश गेल्या २०-३० वर्षांमध्ये पुन्हा मागे गेला आहे. बाबरी मशीद पाडणे आणि ती पाडणारे सत्तेत येणे यातून गुंडगिरीला ‘फळ’ मिळते हे सर्वाच्याच लक्षात आले आणि त्यातूनच झुंडशाहीला राजमान्यता मिळाली, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी व्यक्त केले.
‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ व्यासपीठावर कर्नाड यांनी शनिवारी पुण्यात दिलखुलास गप्पा मारल्या. नाटक, चित्रपट या विषयांपासून कलाकाराने सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणे, चित्रपटांवरील बंदी, देशातील वाढते असहिष्णुतेचे वातावरण अशा विविध मुद्दय़ांवर त्यांनी थेट भाष्य केले. चित्रपटांवरील बंदी, ‘राजकीय सेन्सॉरशिप’ याबाबत कर्नाड म्हणाले, ‘‘आपल्याकडील वातावरण आजकाल कमालीचे असहिष्णू झाले आहे. त्यामुळे सध्या चित्रपटांवर सरकारने बंदी घालण्याची गरज नसते, एखाद्या छोटय़ा गटाला वाटले तरी ते आपल्या भावना दुखावल्याचे सांगून बाहेर पडतात आणि चित्रपटावर बंदी घालायला लावतात. हे फार किळसवाणे बनले आहे. याबाबत कर्नाड यांनी ‘आरक्षण’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, खरेतर हा चित्रपट दलितांच्या बाजूने होता. मात्र, एखाद्या नेत्याला तो आवडला नाही म्हणून त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. आशिष नंदी यांच्या वक्तव्याबद्दलही असेच झाले. ‘जयपूर लिटररी फेस्ट’मध्ये ते दलितांच्या बाजूने बोलले असतानाही त्यांना दलितविरोधी ठरवण्यात आले.’’झुंडशाहीविषयी बोलताना ते म्हणाले, की आपण गेल्या २०-३० वर्षांमध्ये सहिष्णुतेच्या बाबतीत फारच मागे गेलो आहोत. देशातील एका गटाला वाटले म्हणून बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर ते सत्तेतही आले. याच झुंडशाहीतून केंद्रामध्ये दोन खासदारांवरून भाजपचे सरकार आले आणि या झुंडीचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी पुढे देशाचे गृहमंत्री झाले. गुंडगिरीलाही फळ मिळते, हे त्यातून लक्षात आले आणि तेथेच या गोष्टीला राजमान्यताही मिळाली.

आपण गेल्या २०-३० वर्षांमध्ये सहिष्णुतेच्या बाबतीत फारच मागे गेलो आहोत. देशातील एका गटाला वाटले म्हणून बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्यानंतर ते सत्तेतही आले.

Story img Loader