सातारा : सामाजिक प्रगती आणि वैचारिक प्रगल्भतेसाठी बुद्धिवंतांचे असणे समाजासाठी गरजेचे असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी येथे व्यक्त केले. ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर विचार मंचाच्या वतीने सातारा येथे आयोजित ‘महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा आणि नरहर कुरुंदकर’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ‘महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले, ज्यांनी वेळोवेळी जाती, धर्म भेदाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या मशागतीसाठी आणि जडणघडणीसाठी कणखर भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अशा अनेक विचारवंतांची मोठी भूमिका आहे. नरहर कुरुंदकरही त्याच विचारसरणीतले होते. त्यांनी धर्म, धर्मातील भेदाभेद, जातीयवाद या पलीकडे जाऊन भूमिका मांडली,’ असे कुबेर यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘ज्या काळामध्ये ऐकणारे लोक होते, त्या काळात कुरुंदकर होऊन गेले, हे चांगले झाले. ते सध्याच्या काळात झाले असते, तर अनेकांना झेपले नसते आणि दुर्लक्षित करून त्यांना संपवले गेले असते. इतर देशांमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये असे बुद्धिवादी जन्माला आले असते, तर तेथील लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असते, एवढा कुरुंदकरांचा आवाका मोठा होता. त्यांनी व्यंग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नाट्य समीक्षा, धर्म समीक्षा, कलाविश्व, राजकारण अशा अनेक विषयांवर सडेतोड मांडणी केली आहे.’

‘हिंदू धर्म, अल्पसंख्याकवाद, धर्मातील संकुचितपणा आदी बाबींवरही कुरुंदकरांनी कणखर भूमिका मांडली. धर्म आणि नैतिकता याचा काही संबंध नाही, असे ते म्हणत. धर्म आणि जातीबद्दल अभिमान बाळगताना आपण महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचाही अभिमान बाळगायला हवा,’ असे कुबेर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘माणसाच्या विचारसरणीला हादरवेल अशी मांडणी कुरुंदकरांनी केली. हिंदू धर्मातील संकुचितता, भारतीय मानसिकता, सनातनी विचार, अल्पसंख्याकवाद यावरही कुरुंदकरांनी स्पष्ट मत मांडले आहे. प्रौढ मतदानाने सुप्त जातिवाद पुन्हा वर आला. धर्माच्या विचारसरणीतील गोंधळ आपण मान्य करत नाही. त्यामुळे पूर्वीच्या बुद्धिवाद्यांनी मांडलेल्या समाज सुधारणांचे पुढे काय झाले, हा प्रश्नच आपल्याला पडत नाही. संघटना हे धर्माचे सामर्थ्य नसते, तर ते दुबळेपण असते, असेही कुरुंदकर म्हणत.’दिनकर झिंब्रे यांनी आभार मानले. आयोजक किशोर बेडकीहाळ यांनी प्रास्ताविक केले.

‘समाजघडणीसाठी वैचारिक पुनरुत्थान गरजेचे’

‘महाराष्ट्रात सध्या वैचारिक परंपरा सांगितली जात नाही. बुद्धिवाद्यांमध्ये वादविवाद होत नाहीत. मात्र, दुसरीकडे युरोप आणि पाश्चिमात्य देश वैचारिक पुनरुत्थानातून कसे घडले याची चर्चा करतो. समाज घडण्यासाठी वैचारिक पुनरुत्थान गरजेचे असते,’ असे प्रतिपादन गिरीश कुबेर यांनी केले. ‘ज्या वेळी देशामध्ये आणि राज्यांमध्ये सामाजिक सुधारणा होत होत्या, त्या वेळेला महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक आणि तर्कवादामध्ये फारच पुढे होता, हे सर्वांनी मान्य केले होते. त्यामुळे महाराष्ट्राची वैचारिक शक्ती प्रगल्भ झाली. मात्र, ही परंपरा सांगताना आज महाराष्ट्र कुठे आहे, हेही शोधावे लागेल,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader