Congress Maharashtra President Harshvardhan Sapkal: काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. पक्षाच्या या निर्णयाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे पक्षाचे अनेक दिग्गज नेते राज्यात असताना फारसे चर्चेत नसणारे हर्षवर्धन सपकाळ यांना अचानक प्रदेशाध्यक्षपदी नेमून काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांप्रमाणेच पक्षातल्या नेते-पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही धक्का दिल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती पाहाता नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे पक्षाच्या राज्यातील वाटचालीत नेमका काय बदल होणार? सपकाळ यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार? यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टीकोन’मध्ये विश्लेषण केलं आहे.
ईडी दारावर जाणार नाही असा नेता!
काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासाच्या विरुद्ध जात सपकाळ यांची नियुक्ती झाल्याचा मुद्दा गिरीश कुबेर यांनी आपल्या विवेचनात उपस्थित केला आहे. “राष्ट्रीय स्तरावरून नाचवता येईल असा नेता राज्यात नेमण्याची काँग्रेसची प्रथा असली, तरी सपकाळ यांची नियुक्ती त्या मानसिकतेतून झालेली नाही. काँग्रेसचा विचार सरळ होता की असा नेता हवाय ज्याच्या दारावर ईडी किंवा इतर केंद्रीय यंत्रणा जाणार नाहीत. अर्थात, कुठल्याही आर्थिक गैरव्यवहारात हात नाही अशा व्यक्तीची अध्यक्षपदी निवड व्हावी हा त्यामागचा विचार होता”, असं गिरीश कुबेर यांनी नमूद केलं आहे.
“हर्षवर्धन सपकाळ यांची पाटी एकदम कोरी आहे. ते गांधीवादी विचारसरणीतून आल्याचं सांगितलं जातं. पक्षाच्या कार्यालयात जाऊन काम करणं, पक्ष जोडणं, नवीन माणसं जोडणं हे काम त्यांना करावं लागेल”, असंही गिरीश कुबेर म्हणाले.
इथे पाहा ‘दृष्टीकोन’चा संपूर्ण Video!
नव्या प्रदेशाध्यक्षांसमोरील दुहेरी आव्हान!
“काँग्रेसला दरबारी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या पातळीवर जाऊन काम करणारा नेता शोधावा लागेल. सपकाळ यांच्यासमोर हे मोठं आव्हान असेल. पक्ष म्हणून अजूनही आपण चेतना गमावलेली नाही, हे सिद्ध करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल. अन्यथा ज्या पद्धतीने भाजपाचा विस्तार होत आहे, भाजपा इतर पक्षांना गिळंकृत करतोय, त्या पद्धतीने आणखी काही काँग्रेसजन भाजपाच्या गळाला लागतील. अशावेळी पक्षसंघटनेचं अस्तित्व जिवंत ठेवणं आणि मग ती वाढवणं असं दुहेरी आव्हान सपकाळ यांच्यासमोर असेल”, अशा शब्दांत गिरीश कुबेर यांनी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांसमोरील आव्हानांचं विश्लेषण केलं आहे.