Girish Mahajan Cabinet Meeting : निधी वाटपावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलं आहे. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन यांनी अजित पवारांना विचारल्याचा दावा केला जात आहे. याबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. महाजन यांनी काही वेळापूर्वी जळगावात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, मंत्रिमंडळ बैठकीत तुमच्यात आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त खरं आहे का? तुम्ही दोघेही एकमेकांवर नाराज असल्याची देखील चर्चा आहे, याबद्दल काय सांगाल? यावर गिरीश महाजन म्हणाले, आमच्यात अजिबात नाराजी नाही किंवा मंत्रिमंडळ बैठकीत कुठेही खडाजंगी वगैरे झालेली नाही आणि हीच वस्तूस्थिती आहे. उलट मला ती बातमी वाचून खूप आश्चर्य वाटलं होतं.

गिरीश महाजन म्हणाले, आमच्यापैकी कोणीही अजिबात नाराज नाही आणि हीच वस्तूस्थिती आहे. ती बातमी पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं. तसेच जमिनी विकण्याचा वगैरे तर प्रश्नच येत नाही. अजित पवार निधी देताना नाराज होते वगैरे बातम्या खोट्या आहेत. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांना राज्याचा ताळमेळ बघावा लागतो. जमेच्या बाजू व खर्च देखील बघावा लागतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या. नुकतीच आमच्या सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली आहे आणि या योजनेसाठी आपण ४६ ते ४७ हजार कोटी रुपये घालवले आहेत. शेतकऱ्यांचं वीजबिल माफ करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच या दोन योजनांसह इतर योजनांवर मिळून तब्बल एक लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सर्व मंत्र्यांनी तुमच्या ज्या काही योजना असतील, तुमची जी खाती आहेत त्या खात्यांची जी कामं असतील त्यात थोडी कपात करा.

मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं?

ग्रामविकास मंत्री म्हणाले, अजित पवारांचे म्हणणं देखील खरं होतं. खर्च पाहून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूला आमचा आग्रह देखील योग्यच होता. तरी मी अजित पवारांना व मुख्यमंत्र्यांना (एकनाथ शिंदे) विनंती केली की मला ग्रामीण भागात रस्ते बांधायचे आहेत. दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची खूप दूरवस्था झाली आहे, अनेक रस्ते दुरुस्त करायचे आहेत. त्यासाठी मी अर्थमंत्र्यांकडे पैसे मागितले हे खरं आहे. परंतु, त्या खर्चावरून किंवा त्या विनंतीवरून आमच्यात खडाजंगी झाली, आमच्यात वाद झाले किंवा आम्ही नाराज आहोत या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत. जमीन विकू का? वगैरे असं वक्तव्य कोणी केलं नाही.

अजित पवार (PC : Ajit Pawar Facebook)

हे ही वाचा >> Prakash Ambedkar: “श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष”; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

आम्ही दोघेही आपापल्या जागी योग्य आहोत : महाजन

महाजन म्हणाले, आमच्यात कोणी नाराज नाही. उलट मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मला म्हणाले, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण तुमच्या विनंत्यांवर विचार करू. त्यामुळे जमीन विकू का वगैरे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार त्यांच्या जागी योग्य आहेत आणि मी माझ्या खात्याचा मंत्री आहे, ग्रामीण भागात मला कामं करायची आहेत, ग्रामीण भागाला मला न्याय द्यायचा आहे, त्यामुळे माझी आग्रही भूमिका देखील योग्यच आहे.