सावंतवाडी : भाजपचे संकटमोचक पर्यटनमंत्री गिरीश महाजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वेळागर येथील नियोजित ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजन समारंभ स्थळी संकटात सापडले. वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील नियोजित ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाच्या भूमिपूजनास आलेल्या पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी धक्काबुक्की झाली, यादरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यात काही महिला पुरुष जखमी झाले. दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्ते यांनी मागण्यांवर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
आणखी वाचा-Nawab Malik : अपघातात गंभीर जखमी झालेल्या नवाब मलिकांच्या जावयाचा मृत्यू? स्वतः पोस्ट करत म्हणाले…
वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील नियोजित ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी शरदचंद्र पवार मुख्यमंत्री असताना १४३ एकर जमीन संपादन करून प्रकल्प उभा राहिला पाहिजे म्हणून पर्यटन धोरण स्वीकारले. मात्र भूमिपुत्रांनी घरे असलेल्या जमिनी वगळून पर्यटन विकास साधण्यासाठी २५ वर्ष आंदोलन, न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे. या १४३ एकर पैकी सर्वे नंबर ३९ मधील २८. ३० एकर व दुसऱ्या जमिनीतील २२ एकर जमीन वगळून इतर जमिनीवर ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्प उभा राहिला पाहिजे म्हणून सरकार दरबारी पायऱ्या झिजविल्या.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या मतदारसंघात वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्प उभा राहणार आहे. त्यामुळे यापुर्वीच केसरकर यांच्याकडे संघर्ष समिती अध्यक्ष राजन आंदुर्लेकर व आजु अमरे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी भूमिका मांडली. मात्र भूमिपुत्रांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांना आणून केसरकर भूमिपूजन समारंभ आज करण्यासाठी आले असताना त्यांची गाडी रोखली यावेळी सुमारे दोनशे आंदोलनकर्ते यांनी अचानकपणे गाडी रोखल्याने पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी सौम लाठीमार केला. त्यामुळे काहींना दुखापती झाल्या त्यामुळे शिरोडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजन तेली यांची रूग्णालयात जावून विचारपूस केली.
वेळागर येथील भूमिपुत्रांनी दोन मंत्र्यांना रोखल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला दरम्यान पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आंदोलकांची बाजू ऐकून घेतली. आपण सर्वे नंबर ३९ मधील २८.३० हेक्टर व दुसऱ्या सर्वे नंबर मधील २२ एकर जमीन वगळून प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेईन असे आश्वासन दिले. भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी आंदोलनकर्ते यांची भूमिका उचलून धरली.
दरम्यान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजन तर फमेंटो पंचतारांकित हॉटेल प्रकल्प भूमिपूजन समारंभ आयोजित केला होता. पंचतारांकित हॉटेल प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाले तर पर्यटनास मोठा वाव मिळेल अशी त्यांची धारणा आहे.