गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यासंदर्भात परीक्षा आणि नियुक्तीचं वेळापत्रकच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. यानुसार, पुढील वर्षी २७ एप्रिलपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांच्या हाती नियुक्तीपत्र असेल, असं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मार्च २०१८मध्ये आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यात साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. परीक्षाशुल्कही भरलं. पण मधल्या काळात करोना, आरक्षणाच्या अडचणी या गोष्टींमुळे या भरतीकडे दुर्लक्ष झालं. पण आज आम्ही निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाशी संबंधित १० हजार १२७ जागा आम्ही भरणार आहोत”, असं गिरीश महाजन म्हणाले. यामध्ये आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन अशा जागांचा समावेश आहे.

कसं असेल भरतीचं वेळापत्रक?

गिरीश महाजन यांनी सपूर्ण भरती प्रक्रियेबाबत यावेळी माहिती दिली. “मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. २६-२७ मार्चपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल महिन्यात आम्ही उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार आहोत.१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. २५ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी होईल. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan announces health department recruitment timetable exam dates pmw