मी खुलेआम काँग्रेसबरोबर गेलो होतो. तुमच्यासारखं अर्धा रात्री लपून-छपून बैठका घेतल्या नव्हत्या. आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला होता. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्यात हिंमत होती, तर निवडणुकीपूर्वी जायचं होतं, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “तुमच्यात हिंमत होती, तर निवडणुकीपूर्वी काँग्रेसबरोबर जायचं होतं. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि फडणवीसांनी केलेल्या प्रचारानंतर तुमचे १८ खासदार निवडून आले. तुमच्या नावावर खासदार निवडून आले नाहीत. तुमच्यात हिंमत असेल, तर लोकसभा निवडणुकीला उभे राहा. आणि फक्त २ खासदार निवडून आणावे.”
हेही वाचा : “…तर त्यांना कोकणवासीय जनतेला देशद्रोही म्हणायचे असेल”, आदित्य ठाकरेंचं ‘त्या’ भाजपा नेत्याला प्रत्युत्तर
“बाळासाहेब ठाकरे एवढी मोठी शिवसेना तुमच्याकडं सोपवून गेले, तुम्ही काय ठेवलं? तुमच्या तानाशाही आणि हुकूमशाहीमुळे खासदार आणि आमदार राहिले नाहीत,” अशी टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
“पंतप्रधान मोदींवर बोलताना उद्धव ठाकरेंनी थोडं भान ठेवलं पाहिजे. राम मंदिर मोदींनी नाहीतर न्यायालयाने बनवलं असं उद्धव ठाकरे सांगतात. पण, ठाकरेंकडे बघून काय बोलावे? हेच समजत नाही,” असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
“करोना काळात मंदिर बंद ठेवण्यात आली. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही मंदिर उघडत नव्हता? भाजपाने आंदोलन केल्यावर तुम्ही मंदिरे सुरु केली. म्हणून तुम्ही बेगडी हिंदुत्वावर बोलू नका,” अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.