Girish Mahajan On Congress: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, तर महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठं अपयश आलं. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. मात्र, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राज्यातील विविध घटनांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे.
दुसरीकडे महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ हे नारज आहेत. त्यांच्या नाराजीवरूनही टीका-टिप्पणी सुरु आहे. या सर्व घडामोडींवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनीही विजय वडेट्टीवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत मोठं विधान केलं. “काँग्रेस पक्षासह सर्वच पक्षातील नेते आमच्याकडे येण्यासाठी नंबर लावून बसले आहेत”, असा मोठा दावा गिरीश महाजन यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Dhananjay Munde : “मी राजीनामा का द्यावा? याचं काहीतरी कारण…”, विरोधकांच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंचा सवाल
गिरीश महाजन काय म्हणाले?
बीडच्या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला होता. “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, असं खळबळजनक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानासंदर्भात गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे काहीही बोलत असतात. आता राज्यातील विरोधी पक्षाची परिस्थिती कशी झाली आहे? हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काहीतरी भडक बोलायचं आणि कोणावर तरी काहीतरी आरोप करायचे? असं विरोधकांचं काम झालं आहे. बीडचं प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय गांभीर्याने घेतलं आहे. ज्या-ज्या मागण्या झाल्या त्याबाबत चौकशी झाली आहे. त्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. त्यामुळे विरोधी पक्षाकडून होणारे आरोप निराधार आहेत”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं.
काँग्रेसच्या नेत्यांबाबत गिरीश महाजनांचा मोठा दावा
दरम्यान, आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, निवडणुकीत ओबीसी नेते म्हणून भुजबळांचा महायुतीने वापर केला गेला. मात्र, त्यानंतर त्यांना न्याय दिला नाही. ते आमच्याकडे येऊ शकतात, असं वडेट्टीवारांनी म्हटलं असल्याचा प्रश्न गिरीश महाजनांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “छगन भुजबळ हे सक्षम आहेत, त्यामुळे ते ठरवतील. आता एवढ्या वाईट परिस्थितीत त्यांच्याकडे (काँग्रेसकडे) कोण जाईल? उलट त्यांच्याकडे जे आहेत तेच आमच्याकडे नंबर लाऊन बसलेले आहेत. काँग्रेस पक्षासह सर्वच पक्षातील मंडळी आमच्याकडे नंबर लावून बसले आहेत. आता आमचं काय? आम्हाला तुमच्याकडे कधी घेता?”, असा मोठा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.