शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत जोरदार टीका केली. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो,” असं प्रत्युत्तर दिलं. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) जळगावमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाबराव पाटीलही मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. चंद्रकांत खैरेंनी बोलताना तोल सांभाळला पाहिजे. वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण काय बोलावं याचा तारतम्य असायला हवं. आपला जुना सहकारी किंवा कुणीही इतर पक्षाचा असेल, त्यांच्याविषयी बोलताना संयम ठेवला पाहिजे.”
“चंद्रकांत खैरे माझे मित्र आहेत”
“सध्या राजकारणाचा स्तर इतका खालवत चालला आहे की, त्याला पुन्हा एकदा सावरण्याची सांभाळण्याची गरज आहे. चंद्रकांत खैरे माझे मित्र आहेत. मी खैरेंना फोन करून सांगेन की यापुढे बोलताना थोडं तारतम्य बाळगा,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
“याकुब मेमन देशाचा शत्रू आहे”
यावेळी त्यांनी याकुब मेमन वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “याकुब मेमन देशाचा शत्रू आहे. त्याच्या काटकारस्थानामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशा याकुब मेमनच्या कबरीवर लाईटिंग करून सजावट करणे दुर्दैवी आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.”
“कुठलाही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, आपआपसात वाद होईल असे कृत्य करू नये. तसेच महिला वर्गही मोठ्यासंख्येने असल्याने संयम व शांततेत गणरायाला निरोप द्यावा,” असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.