भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. “एकनाथ खडसे आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही. मात्र, ते इतकं बोलत असल्याने सांगावं लागतं,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी शिरपूर येथे गिरीश महाजन आणि मंत्री विजयकुमार गावित यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते आमच्याशी काय बोलत होते हे त्यांना विचारावं. भाषण दिल्यानंतर लगेच ते आमच्याजवळ येऊन अगदी खाली वाकून कानात सांगत होते. यावेळी बाजूचे लोकही ऐकत होते.”
“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”
“मला त्याबद्दल खोटं बोलण्याची गरज नाही. ते इतकं बोलत आहेत म्हणून मला सांगावं लागत आहे. खरंतर माझी सांगण्याची इच्छा नव्हती. ते ज्या पद्धतीने टीका टिपण्णी करतात, बोलतात त्यामुळे आम्हालाही बोलावं लागतं. अन्यथा ते आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.
“खडसेंनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा”
मंत्रिमंडळानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल या एकनाथ खडसेंच्या दाव्यावर गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा. आम्हाला काहीही अडचण नाही.”
हेही वाचा : सीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“एकनाथ खडसेंनी स्वप्न पाहणं बदं करावं”
“मला वाटतं आता एकनाथ खडसेंनी स्वप्न पाहणं बदं करावं. काय करणार, शेवटी त्यांना खूप अपेक्षा होत्या आणि त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळेच ते अधूनमधून असं काही बोलत असतात,” असं म्हणत महाजनांनी खडसेंवर निशाणा साधला.