शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (१२ ऑगस्ट) एबीपी माझाशी बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “पंकजा मुंडे अजिबात नाराज नाही. पक्षश्रेष्ठी निश्चितपणे त्यांच्या कामाची दखल घेत आहेत. ते पंकजा मुंडेवर मोठी जबाबदारी देतील. एक तासापूर्वी पंकजा मुंडेंनी मला फोन केला आणि अभिनंदन केलं. त्या नाराज आहेत असं दिसलं नाही. माध्यमंच त्या नाराज असल्याचं बोलत आहेत.”
“पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील”
“पंकजा मुंडे नाराज नाहीत, माध्यमंच त्या नाराज असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. त्या मध्य प्रदेशसारख्या राज्याच्या प्रभारी आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील,” असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं.
हेही वाचा : “माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रीमंडळात स्थान नाही”, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजन म्हणाले…
“आम्ही दोन पक्ष आणि याबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील”
“आम्ही दोन पक्ष आहोत आणि याबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील. अनेक जिल्ह्यांना न्याय मिळेल. उद्या पाच मंत्री झाले तरी काय वाईट आहे. अधिक वेगाने काम होईल,” असंही महाजन यांनी नमदू केलं.