कसबा आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय संपादन केला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे भाजपाचा २८ वर्षांचा बालेकिल्ला ढासळला आहे. येथील विजयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
“इतके दिवस शिवसेना भाजपाबरोबर होती, त्यामुळे भाजपाचे बालेकिल्ले भक्कम होते. पण आता खरी शिवसेना कुठे आहे, हे स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकीत भाजपाचे सर्व बालेकिल्ले ताब्यात घेऊ,” असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. राऊतांच्या या विधानावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांनी एक जागा जिंकली म्हणजे मोठा तीर मारला असं नाही, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊतांच्या जिभेला हाड नाहीये. त्यांच्या तोंडाला लगाम नाहीये. ते सध्या बेछूट सुटले आहेत. ते दररोज सकाळी उठून कुणालाही शिव्या घालतात, कोणालाही काहीही बोलतात. एक जागा जिंकली म्हणून त्यांनी फार मोठा तीर मारला, असं समजू नये. आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अनेक निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेना काय दिवे लावते, हे त्यांनी दाखवावं, अशी खोचक टोलेबाजी गिरीश महाजनांनी केली.