भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी ३ वर्षांपूर्वी कुणाला तरी दम भरला आणि संस्था सोडून दे अशी धमकी दिल्याचा खोटा गुन्हा माझ्या विरोधात दाखल केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच सध्या खोट्या तक्रारी देण्याचे सत्र सुरू असल्याचं म्हणत त्याची काळजी करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश महाजन म्हणाले, “३ वर्षापूर्वी मी कुणाला तरी दम भरला आणि ही संस्था सोडून दे अशी धमकी दिल्याचा खोटा गुन्हा माझ्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. ३ वर्षे १२ दिवसांपूर्वी इथून ५०० किलोमीटरवर निंभोरे येथे ही घटना झाली असं सांगितलं जातंय. याबाबत तक्रार कशी दाखल झाली याची सर्वांना कल्पना आहे.”

“सध्या खोट्या तक्रारी देण्याचे सत्र सुरू आहे”

“३ वर्षात कुणीच तक्रार देत नाही आणि तुमची सत्ता आल्यावर दीड वर्षांनी आमच्या विरोधात तक्रार दिली जाते. सध्या खोट्या तक्रारी देण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्याची कुणालाच काळजी करण्याची गरज नाही. मी त्याला सामोरं जात आहे,” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

“मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं गिरीश महाजनांना करोना झाला नाही ना?”

या प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, “मला करोना झाला तेव्हा ते म्हणायचे ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसेंना दुसऱ्यांदा करोना झाला. मला तर खरंच करोना झाला होता, पण आता गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा करोना झाला. त्यामुळे मला वाटतं त्यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसतंय. त्या भीतीपोटी तर त्यांना करोना झाला नाही ना असा संशय येतोय.”

हेही वाचा : “ताणतणावाचं वातावरण होतं, मात्र धक्काबुक्की झाली नाही”, भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया

“गिरीश महाजन यांना करोना असला तरी माझी इश्वरचरणी प्रार्थना आहे की गिरीश महाजन या करोनातून लवकर बरे होवोत. त्यांची समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून त्यांची प्रकृती, स्वास्थ्य उत्तम रहावं,” अशी प्रार्थना एकनाथ खडसे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan criticize thackeray government over fir against him for threat pbs