सलग पाच दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणी दौऱ्याच्या दिवशी उफाळून आला. रेल रोको, रास्ता रोको करत त्यांनी संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. यामुळे पालकमंत्र्यांनी सिन्नरचा रस्ता धरला. निफाड तालुक्यात संतप्त शेतकऱ्यांनी तीन तास मनमाड-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक रोखून धरली. रास्ता रोकोचा फटका माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहन ताफ्यालाही बसला.
नाशिकला सलग पाच दिवस गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढल्ेा.शासनाने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. त्यमुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले. निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. या भागात वातावरण तप्त असल्याने पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आले. त्यांच्या वाहनांचा ताफा सिन्नरच्या दिशेने रवाना झाला. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुसरीकडे लगतच्या निफाडमध्ये आंदोलनाचे सत्र सुरू झाले होते. काही वेळातच शेकडो शेतकऱ्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई-मनमाड रेल्वे मार्गावर ठाण मांडत राजेंद्रनगर एक्स्प्रेस तीन तास रोखून धरली. मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या अनेक गाडय़ांना आंदोलनाचा फटका सहन करावा लागला.दुसरीकडे उगाव रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी शेतीची अवजारे रस्त्यावर पेटविण्यात आली.याबाबत महाजन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निफाडला जायचे होते, पण वेळ मिळाला नसल्याचे सांगितले.
२२ हजार ४२२ हेक्टरचे नुकसान
पाच दिवसांच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत जिल्ह्णाातील २२ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याची झळ ३७ हजार ९२९ शेतकऱ्यांना बसली. द्राक्ष, कांदा, डाळिंब, गहू, टोमॅटो, हरभरा आदी पिकांसह कांदा चाळी आणि पोल्ट्री फार्मचे नुकसान झाले आहे. या आपत्तीने १५ तालुक्यातील ३३४ गावे बाधीत झाली आहेत. १० मार्चला पावसाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विशेष जोर नव्हता. तथापि, पुढील तीन दिवस कुठे गारपीट तर कुठे वादळी वाऱ्यासह त्याचा जोर वाढला. याचा सर्वाधिक फटका निफाड, सिन्नर, नाशिक तालुक्यांना सहन करावा लागला. शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस गारपीट झाली. या दोन दिवसात जिल्ह्णाात अनुक्रमे ३३३८ आणि २२४२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यात शेड कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पंचनाम्याबाबत दवंडी द्या
परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महसूल राज्यमंत्री अनिल राठोड यांनीही स्वतंत्रपणे सिन्नर तालुक्यातील १० ते १२ गावांना भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पंचनामे योग्य पध्दतीने होत नसल्याविषयी अनेक तक्रारी आल्या. नाशिक येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत या तक्रारींचा आधार घेत रावते यांनी गावात जेव्हा पंचनाम्याचे काम केले जाईल, तेव्हा आधी दवंडी अथवा तत्सम माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश दिले.