राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. यातील काही बॅनर्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीही त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केल्यामुळे महायुतीत खटके उडू लागल्याचं समजत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणं हा आततायीपणा आहे, असं विधान गिरीश महाजनांनी केलं. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केलेल्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “मला वाटतं की, हा आततायीपणा आहे. असं कुणीही करू नये. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आधीच सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही २०२४ च्या निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे असे काहीतरी विषय काढून विनाकारण काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.”

हेही वाचा- अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार? हसन मुश्रीफ म्हणाले, “फक्त…”

दुसरीकडे,अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील अशाच पद्धतीचं एक ट्वीट केलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच अजितपर्व…”, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून केल्याचं पाहायला मिळत आहे.