मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिवाळीच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर दीपोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी या कार्यक्रमाचे उद्धाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. आकर्षक रोषणाईने शिवाजी पार्क उजळून गेले होते. यावेळी मंचावर राज ठाकरेंबरोबर शिंदे-फडणवीसांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

तत्पूर्वी शिंदे-फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन पाहुणचार स्वीकारला. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी शिवाजी पार्ककडे पायी मार्गक्रमण केलं. मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर जवळीकता वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, यावरती आता भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’; जलयम पुण्यावरून ‘अब्रु वेशीला टांगल्याचं म्हणत’ शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “शिवाजी पार्कवरील भेटीकडे राजकारण म्हणून बघण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा पक्ष आम्ही एकाच मताचे आहोत. आमचे विचार आणि ध्येय एकच आहे. त्यामुळे त्यात गैर काय आहे, असं वाटत नाही. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मनसेबरोबरच्या युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील,” असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.