Girish Mahajan : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीमधील धूसफूस समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा समावेश आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र, रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत दादा भुसे यांना पालकमंत्री पद मिळायला हवं होतं, अशी मागणी करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही नाशिकला स्थानिक पालकमंत्री मिळावा, अशी मागणी केली होती. यावरून चांगलंच राजकारण तापल्यानंतर अखेर राज्य सरकारने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न आता कधी सुटतो हे देवालाच माहिती असं सूचक भाष्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. तसेच या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतीत लवकरच योग्य तो निर्णय होईल, असंही शेवटी त्यांनी स्पष्ट केलं.
गिरीश महाजन काय म्हणाले?
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयासंदर्भात गिरीश महाजन यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन यांनी म्हटलं की, “पालकमंत्रिपदाचा प्रश्न कधी सुटतो हे मला काय माहिती, हे देवालाच माहिती. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला आहे. फक्त नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. पण हा निर्णय देखील चर्चा करून लवकरच सुटेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.