माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली वाहनं मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत. सोळंके यांच्या घरातील साहित्यही जाळण्यात आलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जमावानं सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्नही केला. पण, संतप्त झालेल्या जमावानं सोळंकेंच्या घरावर दगडफेक केली. नंतर पार्किंगमधील वाहनं फोडली आणि पेटवून दिले.
हेही वाचा : अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली; सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या…
सोळंकेंच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक संस्था आणि नगरपालिकेवर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, “गावबंदीपर्यंत आम्ही समजू शकत होतो. पण, वाहनांची तोडफोड आणि एसटी जाळण्यात येत आहेत. आमदारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. गेल्यावेळी जगात प्रशंसा होईल, असं आंदोलन मराठा समाजानं केलं होतं.”
“आताची स्थिती कुणालाही आवडणारी नाही. मूळ मागणी आणि उददेश बाजूला राहिल. आंदोलन भरकटू नये. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे,” असं आश्वान महाजनांनी दिलं.
हेही वाचा : “जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का?”, ठाकरे गटातील खासदाराचा सवाल
“मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कायमस्वरूपी आणि टिकणारे आरक्षण द्यायचं असेल, तर ते कायदेशीर द्यावं लागेल. शिष्टमंडळ चर्चेला पाठवण्यासाठी जरांगे-पाटलांना आवाहन केलंय. शिष्टमंडळ आल्यावर चर्चा करू,” असं गिरीश महाजनांनी म्हटलं.