शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या नेत्यांना आपापल्या गटात सामील करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात सामील होतील, असा दावा मागील काही दिवसांपासून केला जात होता. असे असतानाच आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्विटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. मिलिंद नार्वेकर नाराज असल्याचे मी ऐकतोय असे महाजन म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >>> महाराष्ट्रात मनसेबरोबर नव्या युतीची नांदी? गिरीश महाजन म्हणाले, “राजकारणात…”
“अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात काहीही गैर नाही. ते देशाचे गृहमंत्री आहेत. मोठे नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर असायचे. याच कारणामुळे अमित शाह आणि नार्वेकर यांची चांगली ओळख आहे. मिलिंद नार्वेकर आणि माझी मागील काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भेट झालेली नाही. मात्र चर्चा सुरू आहे की ते नाराज आहेत,” असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच शिवसेना पक्षात (उद्धव ठाकरे गट) कोण राहील, त्यांची साथ कोण सोडेल हे सांगता येत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> Video: पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आक्रमक नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यातील एका सभेत लवकरच मिलिंद नार्वेकर आमच्या गटात येणार आहेत, असे विधान केले होते. गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर मिलिंद नार्वेकर यांच्याकडून काहीही उत्तर न आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. मात्र दसरा मेळावा होण्याआधी त्यांनी एक ट्विट केले होते. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली, असे या ट्वीटमध्ये नार्वेकर म्हणाले होते. त्यांनी या ट्वीटद्वारे मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे, असा संदेश दिल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे.