Girish Mahajan on Rumours about Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ते नाराजी व्यक्त करून थांबले नाहीत तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव घेत थेट टीका देखील केली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान, शुक्रवारी (२४ जानेवारी) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. शाह यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारची खुर्ची दिली. भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान शाह यांनी केलेल्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मालेगावमधील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे सर्वच पक्षांचे लोक होते”, असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. तसेच, “त्या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना खुर्ची दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही”, असेही महाजन म्हणाले.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

गिरीश महाजन म्हणाले, “मला वाटतं तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता. तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वच मंत्र्यांना व आमदारांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, हे वरिष्ठ नेते अनेक वर्षे मंत्री देखील राहिले आहेत. सहाजिकच त्यांना खुर्ची देण्यात गैर काहीच नाही. तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात, मात्र मी त्यावर काही बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. भुजबळ आमच्या वरिष्ठांशी बोलतील. देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुठल्यातरी नेत्याशी बोलतील”.

दुसऱ्या बाजूला, छगन भुजबळ यांनी अलीकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan says only senior leaders can answer is chhagan bhujbal joining bjp asc