उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाजपातील अंतर्गत मतभेदांमुळे वैतागून खडसे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गेले होते. मात्र, आता त्यांनी स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून बाहेर पडले आहेत. मात्र भाजपाने अद्याप त्यांना पक्षात घेतलेलं नाही. विविधी कारणांमुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला आहे. खडसेंना जळगाव भाजपातून विरोध होत असल्याची चर्चा आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष नवीन नाही. महाजनांचा खडसेंना विरोध आहे. अशातच महाजन वेगवेगळ्या राजकीय व्यासपीठांवरून खडसेंवर टीका करताना दिसतात.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी रविवारी (२३ जून) जळगावात एका मेळाव्यात बोलताना नाव न घेता एकनाथ खडसेंवर अप्रत्यक्ष टीका केली. महाजन म्हणाले, “नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आहे. आता आपण विधानसभेकडे वळायचं आहे. सर्वांनी मोठ्या ताकदीने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागायचं आहे. या निवडणुकीबाबत मी वरिष्ठांना सांगितलं आहे की यावेळी (२०२४ ची विधानसभा निवडणूक) आम्ही जळगावातील सर्व ११ जागा तुम्हाला देऊ. जळगावातील आपली एकही जागा पडणार नाही आणि या सर्व जागा आपण मोठ्या मताधिकाने मताधिक्याने जिंकू. मागच्या निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत.”

गिरीश महाजन म्हणाले, “मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला थोडा फटका बसला. हरिभाऊ बागडे त्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पडले होते. ते का पडले? कसे पडले? याची सर्वांना कल्पना आहे. कारण तिथे आपलेच घरभेदी बसले होते. आपल्याच घरभेद्यांनी आपलंच घर फोडलं. त्यामुळे आपल्या दोन जागा पडल्या. परंतु, आता आपण तसं होऊ द्यायचं नाही. मागील वेळी आपण जळगावातून ११ आमदार देऊ शकलो नव्हतो. परंतु, यावेळी आपण सर्वच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत.” महाजनांनी खडसेंचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख एकनाथ खडसेंकडे होता असं बोललं जात आहे.

हे ही वाचा >> NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्…

एकेकाळी भाजपामधील दिग्गजांची जोडी म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडल्यानंतर तर हा वाद आणखीच चिघळला. उत्तर महाराष्ट्रावरील राजकीय वर्चस्व हे त्यामागचं मुख्य कारण आहे. दरम्यान, खडसे आता भाजपात परतणार आहेत. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोनदा भेट घेतली आहे. पक्षश्रेष्टींने त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून खडसे लवकरच भाजपात दाखल होतील.