राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये फोन कॉलवरुन विविध समस्या सोडवल्याचे व्हिडीओ चांगलेच चर्चेत होते. अशाच प्रकारे शिंदे स्टाइलमध्ये आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. इतकच नाही तर या अधिकाऱ्यांशी बोलताना महाजन यांनी आपणच या सदोष रस्त्यावरुन जाताना दोन-तीन वेळा मरता मारता वचलो आहे. किती मृत्यू झाल्यानंतर तुम्हा अधिकाऱ्यांना जाग येणार आहे असा सवाल विचारत महानज यांनी तातडीने काम सुरु करुन महिन्याभरात कामाचं टेंडर काढण्याचे आदेश दिलेत.
जळगाव आणि नाशिकचे पालकमंत्री असणाऱ्या महाजन यांनी सोमवारी धुळ्यामध्ये सुरु असणाऱ्या भाकप, किसान सभा, शेतमजूर युनियनच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने देण्यात यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. यानंतर आंदोलकांनी शिरपूर चोपडा रस्ता, बभळाज रस्ता खराब असल्याची माहिती दिली. यानंतर रस्त्यांचं कामं न केल्याने महाजनांनी अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच फोनवरुन झापलं.
महाजन यांनी अधिकाऱ्यांना फोन करुन, “या इथे सगळं आंदोलन सुरु आहे. मला समजत नाही हा स्पॉट इतका धोकादायक आहे. मागे मी दोन तीनदा गेलेलो. मरता मरता वाचलो. स्पीडनं आल्यावर माणूस हवेत उडतो की कुठं समजत नाही. तुम्हाला हा विषय कळत नाही का?” असा प्रश्न विचारला. तसेच संपाललेल्या स्वरामध्ये महाजन यांनी “इतके लोक इथे मेले, इतके अपघात झाले. अजून किती लोक मरायची वाट बघणार आहात तुम्ही? मी काय म्हणतोय ऐकू येतंय का? मग याचं काय करणार आहात?” असे प्रश्न विचारले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आता करु काम अशी माहिती दिली. त्यावर महाजन यांनी, “आता काढून टाकता मग इतक्या दिवस काय केलं?” असं अधिकाऱ्यांना विचारलं. त्यानंतर, “कोणाला सांगू वरती? लगेच काम करायचं त्यासाठी काय करायचं?” असा प्रश्न विचारला. यानंतर संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फोन दिला. यानंतर महाजन यांनी पुन्हा आपला संताप व्यक्त करताना हा रस्ता धोकादायक असल्याचं सांगितलं.
“नवले, इथे या रस्त्यावर लोक मरत आहेत. तुम्ही इतकं चुकीचं करुन ठेवलं आहे इथे. मी मागे दोनदा-तिनदा आलो होतो तेव्हा मी मरता मरता वाचलो. ज्या स्पीडने माणूस येतो. इथे उडतो अगदी हवेत. तुम्हाला साध्या गोष्टी कळत नाही का काय केलं पाहिजे काय नाही. खड्डा भरायचा विषय नाही हा. इथं खोली इतकी डेंजर आहे. मी रात्री-अपरात्री येतो इथून वेगात माणूस उडतो इथे. म्हणजे गाडी हातात सापडेल की नाही अशी परिस्थिती होऊन जाते,” असं महाजन स्वत:चा अनुभव कथन करताना म्हणाले. “तुम्हाला इथं रस्ता उंच करता येत नाही का?” असं महाजन यांनी विचारलं असता अधिकाऱ्यांनी काम हाती घेतल्याची माहिती दिली. यावर महाजन यांनी संतापून, “घेतलंय म्हणजे किती लोक मेल्यावर करणार? होईल होईल नका करु आता काय परिस्थिती आहे सांगा,” असं विचारलं.
“कधीपर्यंत काम सुरु करत आहात? लवकर काम सुरु करा. जो काही अंदाजित खर्च असेल त्याचा काही अभ्यास केला आहे का? तुम्हाला मंत्र्यांना सांगायला लावू का एका मिनिटामध्ये? किती दिवसात पूर्ण करता ते सांगा मला. मी पालकमंत्री आहे इथे मला उडवा उडवीचं सांगू नका. मार्चच्या आत काम पूर्ण होईल?” असंही महाजन अधिकाऱ्यांना विचारताना दिसलं. तसेच फोन ठेवण्याआधी, “मला बाकी काही सांगू नका हे काम सुरु करा. मी तुमच्या सचिवांची आणि मंत्र्यांशी बोलतो. आजपासून कामाला सुरुवात करा. तुमचं जे काही कागदोपत्री असेल ते सुरु करा. महिन्याभरात टेंडरसाठी आलं पाहिजे,” असे निर्देश महाजन यांनी दिले.