सोलापूर : राज्यात लोकसभेच्या २० जागांवर भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजीचे नाट्य उमटले असले तरी येत्या तीन-चार दिवसांत सर्व ठिकाणची नाराजी दूर होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षातील वातावरण सुरळीत होईल. तसेच महायुतीमधील जागा वाटप यशस्वी होईल, असा दावा भाजपचे नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. शुक्रवारी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित पक्षाच्या मेळाव्यासाठी महाजन आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे २० उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इतर अनेक नेत्यांच्या गोटात समाज माध्यमांतून पडसाद उमटत आहेत. माढा लोकसभेची उमेदवारी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा संपूर्ण हिरमोड झाला असून त्यांचे समर्थक संतापले आहेत. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्धारही बोलून दाखविला जात आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना महाजन म्हणाले, भाजपचे २० जागांवरील उमेदवार जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत. आपल्या जळगावमध्ये खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर तेथेही नाराजी पुढे आली. खडसे यांना मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत साडेपाच लाख मते मिळाली होती. परंतु यंदा त्यांना आणखी जास्त म्हणजे सहा लाख मते मिळवून देण्याचा निर्धार झाला असून आपल्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचे महाजन यांनी जाहीर केले. माढ्यामध्ये इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी येत्या तीन-चार दिवसांत दूर होईल. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आपण स्वतः मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. भाजपची उमेदवारी एकदा जाहीर झाली की पुढे भाजपचा उमेदवार हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवार समजून निवडून आणला जातो. मोहिते-पाटील यांची समजूत घालून भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचा सहयोग घेतला जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा – सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक नाही – मंत्री खाडे

हेही वाचा – नागरिकांनी हक्कासाठी लढले पाहिजे – राहुल गांधी

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याचा मनोदय जाहीर केला असला तरी त्यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काढली जाईल. शिवतारे हे बारामतीतून लढणार नाहीत. महायुतीमध्ये जागांचा तिढा लवकरच सोडविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan statement on bjp candidature the displeasure started in bjp over the candidature will end in four days claimed by girish mahajan ssb
Show comments