Girish Mahajan Vs Ambadas Danve: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. या घटनेचे पडसाद उमटत आहेत. यातच दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर अंबादास दानवे आणि गिरीश महाजन यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अंबादास दानवे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तेव्हाढ्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

सभागृहात नेमकं काय घडलं?

अंबादास दानवे सभागृहात बोलताना म्हणाले की, “सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत? मग त्यांच्या वेळेनुसार कामकाज चालणार आहे का? सभापती महोदय सभागृहाच्या कामकाजाचा क्रम असतानाही तुम्ही एकाचवेळी चार-चार जणांना बोलण्याची परवानगी देता? आता तुम्हाला (दिशा सालियन मृत्यू प्रकरण) चौकशी करायची तर करा. एसआयटी नेमलेली आहे. काही अडचण नाही. मात्र, एका व्यक्तीच्या विरोधात चार-चार जणांनी बोलायचं का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

पण तितक्यात मंत्री गिरीश महाजन काहीतरी बोलले. त्यावर अंबादास दानवे चांगलेच भडकले. दानवे म्हणाले की, गिरीशजी मला बोलूद्या प्लिज. मी तुमच्याशी काही बोलत नाही. मी सांगतो की सभापती महोदय मंत्र्यांचा हस्तक्षेप थांबवायला हवा. नेहमी-नेहमी त्यांची मधी बोलण्याची आवश्यकता नाही. ज्या खात्याचा प्रश्न असेल त्यांनी बोलावं. दुसऱ्यांनी मधी बोलू नये. माझं बोलणं सुरु आहे मग मला बोलूद्या. अन्यथा मी बाहेर जातो, त्यांनाच (मंत्री गिरीश महाजन यांना) बोलायला सांगा. त्यांचं हे नेहमीचच झालंय, कोणत्याही विषयांवर ते मधे बोलतात”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला.

अंबादास दानवे चांगलेच भडकले

गिरीश महाजन यांच्याकडे पाहत अंबादास दानवे यांनी म्हटलं की तुम्ही जा ना मुख्यमंत्र्यांकडे, तिकडे तक्रार करायची तर करा. येथे काय बोलता? तुमचं सरकार आहे ना? मग तुम्ही मागणी कोणाकडे करता? चौकशी करायची असेल तर करा. सभापती महोदय हे मंत्री वारंवार माझ्या बोलण्यात हस्तक्षेप करतात. मग त्यांच्याकडे मी प्रश्न विचारला त्याबाबतीतील खातं आहे का? आता आम्ही राज्यपालांकडे जाऊन आलो. आम्ही राज्यपालांकडे काही मंत्र्यांची तक्रार केली. अशा पद्धतीने काही मंत्र्यांनी नेहमी असं मधे काय बोलायचं? त्यांची मधी बोलण्याची काही आवश्यकता नाही. त्यांची दुसऱ्यांची ऐकायची तयारीच नाही. मग सर्वच तुमचंच खरं करायचं का? चार-चार जण बोलतात तेव्हा आम्ही ऐकतो. मग आता आमचंही ऐकून घ्या. नियमात बसत असेल तरच आम्ही बोलतो. मग आता तुमची परवानगी घेऊन आम्ही बोलणार का? तुम्ही काही सांगण्याची आवश्यकता नाही. अन्यथा माझ्या तोंडातून एखादा शब्द निघून जाईल. तुम्ही काय करणार आहात? काय करणार? तुम्ही काय करणार? तुम्ही स्वत:ला काय समजता?”, असं म्हणत अंबादास दानवे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले. मात्र, त्यांना आमदार सचिन आहीर यांनी पुन्हा त्यांच्या जागेवर बसवलं. मात्र, यानंतर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

Story img Loader