भाजपा नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका,” असं म्हणत गिरीश महाजन यांनी आघाडीतील मतं फुटणार असल्याचा इशारा दिला. “राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार आहे. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० पेक्षा अधिक आमदारांची मतं मिळतील,” असंही महाजन यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश महाजन म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका. शिवसेनेचे आमदार, खासदार कुणाला मतदान करणार आहेत हे सर्वांना कळेल. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार कुणाला मतदान करणार आहे याची त्यांनी चिंता करावी. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील देखील अनेक आमदार भाजपाच्या राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार आहेत. निकालानंतर ते स्पष्ट होईल.”

“विधान परिषद व राज्यसभेप्रमाणे पुन्हा एकदा चमत्कार घडेल”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातून आम्ही २०० मतं घेऊ. निकालानंतर २०० पेक्षा अधिक आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचं स्पष्ट होईल. विधान परिषद व राज्यसभेप्रमाणे पुन्हा एकदा चमत्कार घडेल आणि आम्ही २०० च्या पुढे मतं घेऊ. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला कळेल की त्यांचे आमदार कुठे आहेत,” असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

हेही वाचा : कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले, गिरीश महाजन तर फेटा सोडून… : अजित पवार

“आघाडीच्या सगळ्या आमदारांचा ओघ भाजपाकडे”

“महाविकासआघाडी कुठे राहिली आहे? थोड्याच दिवसात त्यांच्याकडे किती आमदार राहतात हे दिसेल. सगळ्या आमदारांचा ओघ आमच्याकडे लागला आहे. अनेक आमदार आम्हाला विचारत आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीत महाबिघाडी सुरू झाली आहे असं वाटतं,” असंही महाजन यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan warn ncp congress amid presidential election in india pbs