गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात सोमवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. इतिका अखिलेश लोट, असे या मुलीचे नाव आहे. या हल्यानंतर परिसरातील स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. सोमवारी ( २४ ऑक्टोंबर ) सकाळी ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी इतिका गायब झाली. त्यामुळे लोट कुटुंबिय आणि त्यांच्या शेजारच्या रहिवाशांनी घराच्या आसपास आणि जंगलात इतिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : “घरात करमत नाही म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”; माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका
काही वेळाने घरापासून काही अंतरावर इतिका जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केलं. ऐन दिवाळीत अशी दुर्घटना घडल्याने आरे परिसरात शोककळा पसरली आहे. दुसरीकडे आरे कॉलनीत बिबट्याचे हल्ला वाढल्याने परिसरातील स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.