औरंगाबाद ते नागपूरदरम्यान प्रस्तावित उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या मनोऱ्यांमुळे नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये द्यावे, अशी मागणी महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेने केली असून यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद तसेच वर्धा मार्गानेही वाहिनी टाकली जाणार आहे.
औरंगाबाद ते नागपूरदरम्यान महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडकडून (मुख्यालय अहमदाबाद) ७६५ केव्ही क्षमतेची वीज वाहिनी टाकली जाणार आहे. वीज वाहिनीसाठी मोठे मनोरे उभारावी लागतात. त्यामुळे एक ते दोन एकर शेतीचे जबर नुकसान होते. अर्धा ते पाऊण एकर जागा कायमस्वरूपी मनोरे उभारणीत जाते. महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडकडून पंधरा हजार रुपये ते पंधरा लाखापर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जाते. कुणाला किती रक्कम द्यायची याबाबत या कंपनीकडे नियोजन नाही. शेतकऱ्याची गरज व विरोध पाहून रक्कम दिली जाते. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि ऊर्जा सचिवांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पूर्ण मनोरा उभारला आहे त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपये द्यावे, मनोऱ्याचे दोन भाग शेतात आले असल्यास पाच लाख व मनोऱ्याचा एक भाग आला असल्यास अडीच लाख रुपये त्यास द्यावे, अशी मागणी महासम्राट बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय काकडे पाटील यांनी केली आहे. संबंधित कंपनीने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.
नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद तसेच वर्धा मार्गानेही वाहिनी टाकली जाणार आहे. १ हजार ५०० केव्ही व ५०० केव्ही वाहिनीसुद्धा टाकल्या जाणार आहेत. त्यात दोन हजार ते २ हजार २०० शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथील जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक या सर्वाना निवेदने देण्यात आली आहेत.
कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली याची कोणतीही माहिती कंपनीने शासनाला दिलेली नाही. शासन संबंधित कंपनीला कंत्राट देऊन मोकळे झाले आहे. त्याच्यावर नेमके कोणाचे नियंत्रण आहे हे स्पष्ट झालेले नाही. कंपनीच्या नोटीसवर पत्ता, संपर्क क्रमांक, अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा यापैकी काहीही नसते. कंपनीची जिथे जिथे कार्यालये आहेत तेथे कंपनीचा फलकही नसल्याचा आरोप काकडे पाटील यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्याचे वीज वाहिनीच्या मनोऱ्यामुळे नुकसान झाले आहे त्यांनी ९०११८८४८९९ या क्रमांकावर संपर्क साधून वीस दिवसात अर्ज भरून द्यावा, असे आवाहन काकडे पाटील यांनी केले आहे.

Story img Loader