Maharashtra Cabinet Ratan Tata Bharat Ratna Award : उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet) महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. यानंतर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न (Bharat Ratna Award) देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

यावेळी शोकप्रस्तावात म्हटलं आहे की,”उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो. मात्र, त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत रतन टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.”

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Bhokardan Constituency Assembly election 2024 BJP Santosh Danve Chandrakanta Demons print politics
लक्षवेधी लढत: भोकरदन : लोकसभेतील पराभवानंतर दानवेंची प्रतिष्ठा पणाला
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा : २६/११ च्या गोळीबारादरम्यान रतन टाटा ताज हॉटेलजवळ पोहोचले अन्…, मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम; मृतांच्या कुटुंबांना केलेली मोठी मदत

“टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणारा आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे. नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’शी तडजोड केली नाही.”

“तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली”, असं राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावात म्हटलं.