गझल आपल्या भावजीवी वृत्तीने विविध क्षितिजे पाहते. तिच्यात एक आंतरिक उमाळा असतो. गझल जगण्याचे बळ देऊन जाते. गझलने कवितेमधील प्रथमच गद्यप्रायत्ता घालविली व कवितेला पद्याचे स्वरूप आणि एक आंतरिक लय दिली. शब्दांना, भावनांना एक नाजूक तलम पोत दिला, असे मनोगत आठव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी ए. के. शेख यांनी व्यक्त केले.
हिंदी विकास मंच व गझल सागर प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या आठव्या अ. भा. मराठी गझल संमेलनात अध्यक्षीय मनोगत मांडताना कवी शेख बोलत होते. हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या या संमेलनाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अनुपस्थित राहिल्यामुळे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर प्रा. सुशीला आबुटे यांच्यासह स्वागताध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे, मुंबईच्या पु. ल. देशपांडे साहित्य अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे, गझल नवाज पं. भीमराव पांचाळे, प्रा. डॉ. अजीज नदाफ, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी आदी उपस्थित होते.
चार हुतात्म्यांच्या पावन नगरीत भरलेल्या मराठी गझल संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याचे भाग्य लाभले, अशा शब्दात समाधान व्यक्त करीत संमेलनाध्यक्ष शेख म्हणाले, कवींनी कवितेचा, साहित्याचा अभ्यास करून अनेक काव्यप्रकार हाताळून गझलची वाट चोखाळायची असते. भाव कविता लिहिणारे कवी अपरिहार्यपणे आपल्या मनातील आशय गझलमध्ये व्यक्त करतात. वैयक्तिक संवेदनशीलतेला तर कधी काव्यनिर्मितीपूर्वीच्या अवस्थेच्या वेदनांनाही तरलतेने गझल रचना प्रकारातून काव्यबद्ध करू लागल्याचे त्यांनी नमूद केले.
गझल नवाज पं. भीमराव पांचाळे यांनी, श्वास गझल, नि:श्वास गझल द्वेषाची दुनिया बदलते. माणुसकीचा ध्यास घेते, अशी भावना व्यक्त केली. कवी सुरेश भट यांचे स्मारक उभारण्याची सूचना त्यांनी केली. स्वागताध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे, कुलगुरू डॉ. मालदार, महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपक ननवरे यांनी आभार मानले.
दिवसभर चाललेल्या गझल संमेलनात स्थानिक कलावंतांचा मुशायरा, परिसंवाद, गझल मैफल, गझल संगम व रात्री पं. भीमराव पांचाळे यांची गझल संध्या असे भरगच्च कार्यक्रम झाले. सर्व सत्रांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा