‘दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण तिथपर्यंत जाऊ शकेल तर ती पंकजाच आहे. कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तेच आमच्या मनात असल्याने लवकरच आपल्या सर्वाना पाहिजे त्या ठिकाणी पंकजा दिसेल’ असे सांगून माझ्यावर मुंडे यांनी पुत्रवत प्रेम केले आहे. त्यामुळे यापुढे पंकजाच्या पाठीमागे मोठा भाऊ म्हणून सर्व शक्ती उभी करणे हे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
 दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या परळी येथील यशश्री निवासस्थानी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महायुतीतील आमदार विनायक मेटे यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन आगामी निर्णयाबाबत सविस्तर चर्चा केली. मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, मुलगी पंकजा पालवे, प्रीतम, यशश्री व दोन्ही जावई या वेळी उपस्थित होते. त्यानंतर सांत्वन करण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. सर्वाच्याच भावना तीव्र आहेत. या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करून पंकजा पालवे यांच्या पाठीमागे ताकद उभी करावी. गोपीनाथ मुंडे यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण एक व्यक्ती तिथपर्यंत जाऊ शकते, ती पंकजा आहे. त्यामुळे मुंडेंवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या मनात आहे तेच आमच्या आणि पक्षाच्या मनात आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होईल आणि सर्वाना अपेक्षित असलेल्या ठिकाणी पंकजा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष असलो तरी माझ्यावर मुंडे यांनी पुत्रवत प्रेम केले असून मोठा भाऊ असल्याने या पुढील आयुष्याचे ध्येय म्हणून लहान बहीण पंकजा पालवे हिच्या पाठीशी ताकद उभी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुंडे यांचे संबंध बंधुत्वाचे होते. त्यामुळे पंतप्रधान व पक्ष पंकजा पालवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या मुंडे यांच्या केंद्रीय ग्रामविकासमंत्रिपदी पंकजा यांना घ्यावे, या कार्यकर्त्यांच्या मागणीबाबत पक्ष सकारात्मक विचार करत असल्याचे मानले जात आहे.
तुम्हाला माझ्या पदरात टाकून बाबा निघून गेले
राज्यातून वेगवेगळय़ा भागांतून सांत्वनासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना हुंदके आवरता आले नाहीत. आमदार पंकजा सर्वाचे सांत्वन करताना बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या वेळी कार्यकत्रे ताई, बोलू नका म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. अशाही परिस्थितीत धीरोदात्तपणे आलेल्या लोकांशी बोलताना पंकजा म्हणाल्या, ‘आतापर्यंत मी बाबांसाठी काम करत होते, मात्र तुम्हाला माझ्या पदरात टाकून बाबा निघून गेले. आता मी तुमची काळजी घेईन,’ असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

Story img Loader