दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या मग बघा कसा खप वाढतो असे वक्तव्य करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच वाद ओढवून घेतला आहे. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या वेळी ते बोलत होते. ‘भिंगरी’ ‘ज्युली’, ‘बॉबी’ असल्या नावांची दारु चांगली खपते. तुम्ही उत्पादन करत असलेल्या दारुचे नाव महाराजा आहे मग कसे काय जमेल? त्या दारुचे नाव महाराणी करा मग बघा कसा खप वाढतो असे गिरीश महाजन यांनी विनोदाने म्हटले. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलामात्र अनेकांना महाजन यांचे हे वक्तव्य अजिबात न रूचल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

साखर कारखान्यांनी निर्मिती केलेल्या दारूला महिलांची नावे दिल्यास खप वाढेल हल्ली तंबाखूची नावेही कमल, विमल अशीच असतात. तसाच प्रयोग दारुच्या बाबतीत करा असा सल्लाच त्यांनी यावेळी दिला. ज्यानंतर गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले आहेत.

याप्रकरणी चंद्रपुरातील दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव द्या असे म्हणत गिरीश महाजन यांनी महिला वर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर महाजनांवर कारवाई व्हावी यासाठी आपण राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत गिरीश महाजन यांच्याविरोधात आंदोलन केले. हा भाजपचा खरा चेहरा आहे असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून गिरीश महाजनांवर टीका केली आहे.

Story img Loader