प्रसंगी तोटा सहन करूनही जागावाटपात घटक पक्षांना सामावून घेतले जाईल, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लातूर येथे पत्रकार बैठकीत सांगितले.
महायुतीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम, रिपाइं या घटक पक्षांशी भाजप व शिवसेनेचे नेते स्वतंत्ररीत्या चर्चा करणार आहेत. त्यानंतर शिवसेना व भाजपची वेगळी चर्चा होऊन २५ ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही एकत्रित यश मिळवण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपत पक्षप्रवेश मिळावा म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळी संपर्कात आहेत. मात्र सरसकट प्रवेश दिला जाणार नाही. ज्या जागा १० हजार मतांपेक्षा कमी मताने २००९ साली गमवाव्या लागल्या त्या ठिकाणी इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. २५ हजारांपेक्षा अधिक फरकाने जेथे पराभव झाला आहे, अशा ठिकाणी इतर पक्षातील मंडळींना प्रवेश दिला जाईल. मात्र ज्यांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती कमी होईल, अशांना प्रवेश नाकारू, असे ते म्हणाले.
दूरचित्रवाहिनी माध्यमातून जे सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाले आहेत ते शास्त्रीय आहेत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास बळावला असला तरी ‘दे रे हरि खाटल्यावरी’ असे होणार नाही, याची आम्हाला जाणीव असून सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचले तरच भरघोस यश मिळेल. राज्यात चप्पलफेक, शाईफेक असे प्रकार होतात. त्याचे समर्थन करता येणार नाही. मात्र, सरकारमध्ये बसणाऱ्या मंडळींनी लोक इतक्या टोकापर्यंत का भूमिका घेतात, याचाही विचार करावा, असे त्यांनी म्हटले.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात दंगली वाढल्या आहेत, हा सोनिया गांधी यांचा आरोप राजकीय असून त्याचा फटका आगामी निवडणुकीत काँग्रेसला बसेल, अशी टिप्पणी त्यांनी केली. आमदार पंकजाताई मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, अशी भाजप कोअर कमिटीची मागणी असून त्यासंबंधीचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या बैठकीत आमदार सुधाकर भालेराव, रमेश कराड, गोिवद केंद्रे, संभाजी पाटील निलंगेकर, नागनाथ निडवदे, गणेश हाके आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा