मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून ओबीसीमधून आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच हेच टिकू शकते अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी शांताराम कुंजीर म्हणाले की, राज्यात मागील दोन वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले असून राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीने शासनाला आज अहवाल सादर केला आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ३० नोव्हेंबर पर्यंत थांबा असे सांगत आहेत.
आता आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहीला नसून त्यांनी 25 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली तसेच ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून संवाद यात्रेस पुण्यातून सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार असून २६ तारखेला विधानभवनावर ही यात्रा धडकणार आहे. या कालावधीमध्ये जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास आम्ही भविष्यात आणखी तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.