सामान्य लोकांना पाणी देणे ही सरकारची जबाबदारी असून, भविष्यात ५ वष्रे दुष्काळ पडेल, असे गृहीत धरून पाणी आरक्षित केले पाहिजे, अशी मागणी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी लातूर येथे केली.

कवठा येथील सेवाग्रामच्या पुढाकाराने महाराष्ट्रदिनी जलसंचयन संकल्प, सत्याग्रह कार्यक्रमात ते बोलत होते. एकता परिषदेचे पी. व्ही. राजगोपाल, आमदार अमित देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, सेवाग्रामचे विनायकराव पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अख्तर शेख आदी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह म्हणाले, की देशभर जलसत्याग्रह कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दिल्ली येथे ५ मे रोजी देशातील कार्यकत्रे जंतरमंतरवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात लातूरहून केली जात आहे. लातूरकर आपल्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी सरकार व समाज एकत्रित येऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उपक्रम राबवत आहेत. लातूरने सुरू केलेला उपक्रम संपूर्ण देशभरासाठी दिशादर्शक बनू शकतो. सर्व कामे सरकारनेच करावीत, अशी भूमिका न घेता लातूरकरांनी आपले योगदान दिले आहे. आज देशात अशाच सहभागाची गरज आहे. दोन वर्षांत पाणीदार लातूर तयार होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

प्रत्येकाला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. अनेक कंपन्या जमिनीतील पाणी उपसून त्याचा व्यापार करतात, मात्र गरीब शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याचे प्राधान्य सुरुवातीला पिण्याला, त्यानंतर शेतीला व शिल्लक राहिले तर उद्योगाला असा कायदा केला पाहिजे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय सुरू केले, मात्र अजून धोरणनिश्चिती झाली नाही. ती केली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. आगामी पाच वष्रे दुष्काळ पडेल, असे गृहीत धरून पाण्याचे आरक्षण केले पाहिजे. पावसाचे चक्र बदलत आहे त्यामुळे पीकपद्धतीसाठीही धोरणनिश्चितीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कवठय़ाचे विनायक पाटील यांनी सेवाग्राम येथे ३ कोटी लीटर पाणी साठवणारे मोठे शेततळे तयार केले आहे. लातूर संकटात असताना अनेक जणांनी पाणी देण्यास विरोध केला. लातूर व आसपासच्या अडचणीच्या मंडळींना पाणी देण्यासाठी आपण पुढाकार घेत असून, २५ लाख लीटर पाणी टँकरने लातूरला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकमेकांना अडचणीत मदत करणे ही आपली संस्कृती आहे याचे भान लोकांत निर्माण व्हावे यासाठीच हा उपक्रम घेतला असल्याचे पाटील म्हणाले.

आमदार अमित देशमुख यांनी लातूर परिसरात दरवर्षी ५ लाख रोपे नव्याने लावून त्याचे संगोपन करणार असल्याचे सांगितले. केरळ येथील एकता परिषदेचे पी. व्ही. राजगोपाल यांनी पाण्यासाठीची सूक्ष्म लढाई गावपातळीवर, तर धोरणे बदलण्याची लढाई दिल्ली स्तरावर राबवली जाणार असल्याचे सांगितले. पाणी व अन्न हे प्रत्येकाला मिळाले पाहिजे. त्यासाठी सरकारने धोरण बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. योगिराज माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कचरे यांनी आभार मानले.

Story img Loader