लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएमधील काही नेत्यांनीही मंत्रि‍पदाची शपथ घेतली. केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला पाहिजे तेवढं यश मिळवता आलं नाही. महाराष्ट्रात ४८ जागांपैकी महायुतीच्या फक्त १७ जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीच्या ३० जागा निवडून आल्या. आता विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. मात्र, त्याआधी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भाने बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आणि त्याआधी भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देत चांगली पदेही दिली आहेत. यावरूनही आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भारतीय जनता पक्षाला सल्ला देत ‘आयाराम गयारामांचे किती लाड पुरवणार?, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी पसरेल’, असा सूचक इशारा दिला आहे.

हेही वाचा : सरकारकडून मनोज जरांगेंचा काटा काढण्याचा प्रयत्न? शिंदेंचे आमदार म्हणाले, “काही प्रस्थापितांनी…”

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत आम्हाला जाणवलं की, आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावे? यालाही काही निर्बंध असणं गरजेचं आहे. शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचं नेतृत्व आम्ही करतो. मग त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तरामध्ये उमटलं पाहिजे. निश्चतपणे योग्य तो सन्मान घटक पक्षांना देणं गरजेचं आहे. अन्यथा आमचे कार्यकर्ते फक्त लढण्यापुरतेच आहेत का? अशी भावना निर्माण होईल. तसेच आमच्याही कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

सदाभाऊ खोत यांच्या विधानाची राज्यात चर्चा

दरम्यान, सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत. सदाभाऊ खोत हे आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतात. त्यांच्या अडचणी आणि किंवा काही मागण्या असतील तर ते अगदी खुमासदार शैलीत मांडतात. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी त्यांनी केलेल्या काही विधानांची चांगलीच चर्चा रंगली होती. ते म्हणाले होते की, “जे जे गडी विरोधात आहेत, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एकाला आत टाकायला सुरूवात करा, सगळे गडी रांगत रांगत चालायला लागतील. पण सरकार फक्त भीती दाखवते आणि सोडून देते असं करू नका”, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती.