दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्टय़ात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उरमोडी उपसा सिंचन योजनेतून कडेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त चार गावांसाठीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन आज ढाणेवाडी येथे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक शिवाजीराव उपाध्ये, जिल्हाधिकारी दीपेद्र सिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, भारती विद्यापिठाचे कार्यवाहक डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.
कायम दुष्काळी भागाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ प्रकल्पांना शासनाने गती दिली असून दुष्काळी भागातील तलाव, बंधारे या योजनेतून भरून घेण्यात येत आहेत. या योजनांचे ३० सप्टेंबर अखेरचे वीज बिल शासन टंचाई निधीतून भरणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
राज्यातील टंचाईग्रस्त भागात टंचाईच्या उपाययोजनांना ३० सप्टेंबर अखेर मुदतवाढ दिल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, टंचाई कालावधीत टंचाईग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना प्राधान्याने हाती घेण्यात येत असून अशा २५ लाखांपर्यंतच्या योजना मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून विभागीय आयुक्तांना १ कोटी पर्यंतच्या योजना मंजुरीचे अधिकार दिले आहेत.
कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी, उपाळे-मायणी, खेराडेवांगी आणि येतगाव या टंचाईग्रस्त गावांना उरमोडी प्रकल्पातून पाणी देण्यासाठी १५ कोटी ५० लाखांची तरतूद टंचाई निधीतून करण्यात आल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ही योजना गतीने पूर्ण करून टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे. या योजनेमुळे या चार गावांतील १० हजार २९७ लोकसंख्येस तर जवळपास ६ हजार पशुधनास पाणी मिळणार आहे. उरमोडी प्रकल्पाअंतर्गत खटाव कालव्यामधून ७ किलोमीटर लांबीचा जलद गती संदिग्ध कालवा काढून पुढे वित्रीकाद्वारे या गावांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. गावकऱ्यांनी गावाच्या सर्वागीण विकासासाठी एकदिलाने आणि एकविचाराने काम करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले. प्रारंभी सोमनाथ धनवडे यांनी स्वागत केले. शिवाजीराव ढाणे यांनी या योजनेबाबत माहिती दिली. समारंभास सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडूसकर, तहसीलदार हेमंत निकम, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘पाणी दुष्काळी पट्टय़ातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध’
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्टय़ात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
First published on: 18-08-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give water to all citizen patangrao kadam