माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका
राज्यसभेवर जाण्याची आपली स्वत:ची अजिबात इच्छा नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यासाठी आपल्या नावाचा विचार होण्याची शक्यता दिसत नाही. पाच-दहा नव्हे तर तब्बल ४० वर्षे सत्ताकारणात राहून अनेक महत्त्वाची पदे सांभाळल्यानंतर आता पुन्हा इच्छा राहिली नाही. त्यापेक्षा आता संधी देताना तरुणांनाच वाव मिळावा, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
बुधवारी दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना शिंदे यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकास्त्रही सोडले. सत्ताधारी भाजपने विरोधकांबद्दल सूडबुद्धीचे राजकारण करणे फार काळ टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, आपणासारख्या तळागाळातील दलित वर्गातील कार्यकर्त्यांला काँग्रेसने मोठे केले व इथपर्यंत पोहोचविले. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रात ऊर्जा व गृहमंत्री, लोकसभा सभागृह नेता अशा किती तरी जबाबदाऱ्या दिल्या. सत्ताकारणात यापेक्षा आणखी काय हवे? तब्बल ४० वर्षे सत्ताकारण केल्यानंतर आता पुन्हा राज्यसभेत जाणे स्वत:ला उचित वाटत नाही, असे शिंदे यांनी नमूद केले. पक्षश्रेष्ठींनी आता तरुणवर्गाला संधी द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. राज्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ प्रकरणी व छगन भुजबळ यांना आणखी दुसऱ्या घोटाळ्यात अडकावण्याचा भाजप सरकारचा डाव राजकीय द्वेषभावनेने प्रेरित आहे. नॅशनल हेरॉल्डप्रकरणीही गांधी कुटुंबीयांना खोटेपणाने गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूडबुद्धीचे हे राजकारण फार काळ टिकणार नाही. कारण जनतेला ते रुचत नाही, हे यापूर्वी देशाने पाहिले व अनुभवले आहे, तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतात, हे जनता चांगलेच ओळखून आहे, असे शिंदे यांनी सांगितले. हैदराबाद विद्यापीठात प्रशासनाकडून झालेल्या छळामुळे आत्महत्या केलेला रोहित येमुला हा विद्यार्थी दलित आहे की ओबीसी, हे सत्ताधारी भाजपची नेते मंडळी सांगू शकत नाहीत. राहुल गांधी यांना या प्रश्नावर हैदराबादला जावे लागले. यात त्यांचे राजकारण नाही. ही संधी राहुल गांधी यांना अखेर भाजपनेच दिली, अशी मल्लिनाथीही शिंदे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा