सावंतवाडी : अमेरिकेने सुरू केलेल्या ‘टेरिफ वॉर’मुळे जगावर मंदीचं सावट आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेत वास्तव्यास असलेल्यांना परिणाम भोगावे लागतील, याचा गांभीर्याने विचार करत आपल्याला स्वतःचे मार्ग काढून स्वयंपूर्ण व्हावे लागेल. स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला आहे हे लक्षात ठेवून काम करावे लागेल. त्याचबरोबर कोकणातील अर्थव्यवस्था आपल्याला स्वयंपूर्ण बनवावी लागेल. कोकणातील व्यावसायिकांनी भविष्यात सतर्क राहून पुढचा मार्ग सुखद कसा करता येईल याचा विचार करायला हवा, असे मत माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले ‘टेरिफ वॉर’ संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला कुठे घेऊन जाईल या बाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या विनंती वरून अर्थतज्ञ आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभु यांनी त्यावर केलेले भाष्य केले आहे.
ते म्हणाले, “अमेरिकेने जवळजवळ सर्वच राष्ट्रांवर एक टेरिफ वॉर सुरू केले आहे. अमेरिका ही आतापर्यंत सर्वच जणांना एक थीम कंट्री वाटायची. की जिकडे जावे आणि त्या भूमीमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करावे आणि खूप यशस्वी व्हावे. आज आपल्या देशावर म्हटलं तर संकटच आहे. त्याचं कारण म्हणजे या युद्धामध्ये जीवितहानी होईल ती वेगळ्या पद्धतीची असेल. लोकांच्या नोकऱ्या जातील. उद्योगधंदे बंद पडतील. आफ्रिकेसारख्या गरीब देशांवर तर दुहेरी संकट आहे. अमेरिकेकडून गरीब देशांना जी कोट्यावधी रुपयांची मदत दिली जात होती ती बंद केली आहे. ते आता कमी आहे असे वाटावे की काय त्यांनी आता एका मोठ्या पद्धतीचे युद्ध सुरू केले आहे. ज्यामध्ये लहान उद्योगधंदे बंद पडतील. सर्वसामान्य माणसांचे जीवनमान आणखीन कठीण होईल. आपल्याला कल्पना आहे की अमेरिका हा देश असा आहे की तेथे अनेकांना जावेसे वाटते अनेक भारतीय लोक तेथे वास्तव्यास आहेत. ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तिथे त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. काहींनी लहान सहान उद्योग सुरू केले आहेत. अशा व्यक्ती आपल्या आई-वडिलांना, नातेवाईकांना घेऊन तेथे घर बांधून सुखा समाधानाने संसार करत आहेत. मात्र, आता सगळ्यांवर संकट आहे. अमेरिकेने सुरू केलेल्या टेरिफ वॉरमुळे प्रत्येक देशातून आयात केलेल्या गोष्टींवर किमान दहा टक्के आयात शुल्क लावला जाईल, असा निर्णय घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारताचा सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर चीन आहे. चीनला आपण जे निर्यात करतो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण आयात करतो. चीनकडून आपण नऊ लाख कोटी रुपयांची जास्त आयात करतो. चीनकडून आपल्याला मोठी आयात तूट असल्याने परदेशी धंद्यांवर विपरीत परिणाम होतो. अमेरिकेची गोष्ट निराळी आहे. ४५ बिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ चार लाख कोटी रुपये एवढा अमेरिकेकडून आपल्याला टेरिफ सरप्लस आहे. एवढ्या कोटी रुपयांची निर्यात आपण अमेरिकेला करतो. त्यामुळे भारतातील अनेक लहान सहान उद्योग जे इंजीनियरिंग, गारमेंट, फार्मासिटिकल्समध्ये आहेत. अशा अनेक उद्योगधंद्यांना परदेशी बाजारपेठ अमेरिकेत मिळाल्यामुळे त्यांचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, आता सर्व धंद्यांवर गंडांतर येणार आहे.”
जेव्हा ट्रम्प पहिले राष्ट्रपती झाले तेव्हा मी देशाचा वाणिज्य मंत्री होतो. त्यामुळे अनेक वाटाघाटी त्यांच्याशी मी केल्या आहेत. त्यावेळी सुदैवाने ठिणगी पडली पण त्यावेळी युद्ध सुरू झाले नव्हते. आज मात्र वर्ल्ड वॉर सुरू झाले आहे आणि त्यामध्ये भारताला खूप काळजी घ्यावी लागेल. अमेरिकेमुळे जगावरच मंदीचे सावट पडलेले आहे. मंदी आली तर त्याचा परिणाम भारतावरही होईल. त्यामुळे केवळ अमेरिकाच नाही तर आपण ज्या देशांमध्ये निर्यात करतो तिकडे मंदी आली तर स्वाभाविकपणे तेथे कमी आयात होईल. त्यामुळे आपला व्यवसाय कमी होणार. त्यामुळे हे फार मोठे आपल्यावर संकट ओढवले आहे. अमेरिकेने स्वतःच निर्माण केलेली ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर ते आज एका क्षणामध्ये पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
प्रभू म्हणाले,या विषयासंदर्भात आपण लवकरच सिंधुदुर्गात येईन.आपण चर्चा करून पुढचा मार्ग सुखद कसा करता येईल याचा विचार करू. पण, हे सर्व करण्यासाठी व्यावसायिकांनी सतर्क राहायला हवे. पुढच्या काळातील भविष्य आपल्यालाच घडवायचे आहे. कोकणी माणसांमध्ये अनेक प्रकारच्या कला आहेत. पुढच्या काळात आपल्याला कलेला इच्छाशक्तीची जोड देऊन नवीन कोकण निर्माण करायचे आहे. तो करण्यासाठी ही एक संधी आहे. धोक्याची घंटा वाजतच आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी जागरूक राहून पुढच्या काळामध्ये आपल्याला भविष्य कसे उज्वल करता येईल हे पाहायचे आहे. यासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहनही त्यांनी केले.