उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महात्मा गांधींचा खुनी असलेल्या नथुराम गोडसेचं उद्दातीकरण केलं गेलं आहे असं वक्तव्य फोटो दाखवत अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार यांनी राईट टू रिप्लायमध्ये हा मुद्दा समोर आणला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात अशी गोष्ट घडणं योग्य नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?
दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ. त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. मात्र त्यांच्याच मतदारसंघात जैताला रोडवर नथुराम हिंदू महासभा झेंडा लावण्यात आला आहे. स्वतंत्र भारतातला पहिला आतंकवादी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली हे उभ्या जगाला माहित आहे. अशा खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राहणार? या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनही झालं. तरीही काही घडलं नाही, हे असं चाललं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महापुरूषांचा अपमान केला जात असेल तर
आपण ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल किंवा महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या महान व्यक्तींबाबत सगळ्यांना सन्मान आहे. असं असताना आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडते आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. हे तर ताजं उदाहरण आहे म्हणून सांगितलं. अशी कितीतरी उदाहरणं मी किंवा इतर सहकारी देऊ शकतात. मध्यंतरी आम्ही आणि आमच्या सहकारी पक्षांनी मुंबईत मोर्चाही काढला होता. देशातले जे महापुरूष आहेत त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यासंदर्भात अक्षरशः ऐकवणार नाहीत अशी वक्तव्यं काहींनी केली. या सगळ्याकडे वेगळ्या प्रकारे बघण्याचा माझा दृष्टीकोन नाही. सत्ताधारी पक्षाचे मान्यवर, प्रवक्ते, आमदार या सगळ्यांना आवर घातला पाहिजे. आमच्याकडे कुणी बोलत असेल तर त्यांनाही आवर घातला पाहिजे अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.
अनिल देशमुख यांची काय चूक होती?
अनिल देशमुख यांची काल तुरुंगातून सुटका झाली आहे. १४ महिने ते तुरुंगात होते. त्यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने १०० कोटींची खंडणी वसुली केल्याचे आरोप केले. मात्र पुरावा काहीही नाही. तरीही हे आरोप झाले आणि त्यांना १४ महिने तुरुंगात काढावे लागले. संजय राऊत आपल्या सभागृहाचे सदस्य नाहीत ते संसदेचे सदस्य आहेत पण त्यांनाही तुरुंगात जावं लागलं. आम्हीही आरोप करतो मग तुमच्या आमदारांना तुरुंगात टाकणार आहात का? असाही प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला काय सहन करावं लागलं हे आपण जरा विचार करून पाहा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.