गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर येत्या १५ एप्रिलपासून प्रवेश करआकारणी करण्यात येणार आहे. गोव्याच्या सहा सीमांवर टोलबुथ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील वाहनधारकांत प्रचंड नाराजी आहे. सिंधुदुर्गात वाहनांना येण्यास सीमेवर रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे.गोवा राज्याची नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांना या प्रवेश करातून वगळले जाणार आहे. शेजारील राज्याच्या वाहनानाही प्रवेश कर आकारला जाणार असल्याने कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागातील वाहनधारकांत प्रचंड नाराजी आहे.
गोवा राज्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगांव या जिल्ह्य़ातील वाहने कायमच गोवा राज्यात जातात. त्यामुळे या भागातील वाहनधारकांना आर्थिक फटका बसणार आहे. शिवाय गोवा राज्यातील रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे नेले जाते. त्या वाहनांनाही आर्थिक फटका बसेल असे बोलले जात आहे.
गोवा राज्याच्या सीमेवर सहा ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी १५ एप्रिलपासून टोल वसुली गोवा सार्वजनिक बांधकाम खाते करणार आहे. पुढील दोन महिन्यांचा अंदाज घेऊन  निविदा जारी करून टोल वसुलीसाठी खाजगी कंत्राटदार नेमण्यात येईल असे सांगण्यात आले.
गोव्याच्या सीमेवर आरोंदा-किरणपाणी, पेडणे-धारगळ, केरी-सलटी, मोले व पोळे या सहा ठिकाणी टोलनाके बसवून बांधकाम खाते टोल वसुली करणार आहेत. त्यासाठी टोलनाके उभारण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गोवा राज्यातील वाहनांना प्रवेश कर आकारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य यांचे दैनंदिनी आर्थिक, सामाजिक व्यवसाय सुरू असल्याने सिंधुदुर्गच्या वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वाहनधारक मालक व चालकांच्या सह्य़ांचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना देऊन प्रवेश कराचा फेरविचार करण्याची मागणी  केली जाईल असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.