गोकुळ दूध महासंघाची सर्वसाधारण सभा सध्या कोल्हापूरच्या गोकुळ शिरगावमधील पंचतारांकित वसाहतीच्या मैदानात होत आहे. या सभेच्या आधीपासून सत्ताधारी सतेज पाटील गट, हसन मुश्रीफ गट व विरोधातील महाडिक गट यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं दिसून आलं. आज सभेच्या दिवशीही त्याचाच पुढचा अंक कोल्हापूरकच्या महालक्ष्मी पशुखाद्य मैदानात रंगताना पाहायला मिळत आहे. सभेला आलेले निम्म्याहून अधिक सदस्य बोगस असल्याचा खळबळजनक आरोप शौमिका महाडिक यांनी केला असून त्याला सतेज पाटील व हसन मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं कोल्हापुरात?
आज गोकुळ दूघ महासंघाची ६१ वी सर्वसाधारण सभा होत असून या सभास्थळी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास गोंधळ घालायला सुरुवात केली. सभेत जाण्यापासून मज्जाव करण्यात आल्याचा, तसेच सभास्थळी बॅरिकेट्स लावून सदस्यांना रांग लावायला सांगितल्याचा दावा महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच, काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून सभेत शिरण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
शौमिका महाडिक यांचा आरोप
दरम्यान, सभास्थळी आलेल्या शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. “आत असणारे निम्म्याहून अधिक सभासद बोगस आहेत. हे सभासद झेरॉक्स घेऊन आले आहेत. इथेच झेरॉक्स वाटण्यात आल्याचंही मला समजलंय. बाहेर थांबलेले अनेक खरे सभासद अजून आत गेलेले नाहीत. दोन किलोमीटरपर्यंत रांग लावलेली आहे. एका तासापासून हे लोक तिथे थांबलेले आहेत”, असा आरोप महाडिक यांनी केला.
गोकुळ दूध महासंघाच्या सर्वसाधारण सभास्थळी गोंधळ, महाडिक समर्थक आक्रमक
हसन मुश्रीफांचा टोला
दरम्यान, शौमिका महाडिकांना हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला आहे. “ज्यावेळी आपल्याकडे बहुमत नसतं, तेव्हा गुंड आणून काहीतरी दंगा करण्याचा प्रयत्न असतो”, असं ते माध्यमांना म्हणाले. “सभेसाठी सभासद एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आमचा सत्तारूढ पक्ष आहे. आम्ही शांततेत सभा घेणार. सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. यात लपवण्यासारखं काय आहे? दोनच वर्षं झाली सत्ता येऊन. आम्ही सगळ्यात चांगला कारभार केला आहे”, असं हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
महाडिकांचे गुंड दंगा करतायत – सतेज पाटील
गोंधळाच्या प्रकारावर बोलताना सत्ताधारी सतेज पाटील यांनी महाडिकांच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख गुंड असा केला. “सभासद आधी येऊन बसले आहेत. महाडिकांचे गुंड दारात येऊन दंगा करत आहेत. हे कोल्हापूरच्या दृष्टीने, सहकाराच्या दृष्टीने अशोभनीय आहे. जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं संचालक मंडळ देणार आहे. सभा कितीही वेळ चालली, तरी चालवण्याची आमची तयारी आहे”, असं सतेज पाटील यांनी माध्यमांना सांगितलं.