लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिरामध्ये गुरूवारी पहाटे अज्ञातांने चोरी करून मुर्तीच्या अंगावरील १८ तोळे सुवर्णालंकार आणि एक किलो चांदीचे दागिने असा १५ लाखाचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.
मिरजेपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या आरग या बाजारपेठेच्या गावातील मध्यवस्तीत असलेल्या पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी समोर आली. मंदिराचे पुजारी सकाळी पूजेसाठी मंदिरात गेले असताना मंदिराच्या गाभार्यास असणार्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा निखळून पडल्याचे लक्षात आले. यानंतर मुर्तीवरील दागिनेही लंपास करण्यात आल्याचे समोर आले. ही बाब तात्काळ मिरज ग्रामीण पोलीसांना कळविण्यात आली. पोलीसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वान पथकाकडूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे दुचाकीने येउन चोरी करून दुचाकीनेच पसार झाले असावेत असा कयास आहे.
सदरची घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून चोरट्याने बाजूच्या जिन्याने मंदिरात प्रवेश करून गाभार्याचा कडी कोयंडा कटावणीने तोडला असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यातच या ठिकाणी पद्मावती देवींचा मोठा उत्सव झाला होता.या उत्सवासाठी सांगली, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील भाविकांनी हजेरी लावली होती. मध्यवस्तीत चोरी झाल्याने गावात खळबळ उडाली असून चोरीबाबत मंदिराचे विश्वस्त शीतल उपाध्ये यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिरज ग्रामीण ठाण्याचे एक पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक चोरट्यांचा तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd