लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र आणि सातारा गादीचे वारस छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांची सुवर्णमुद्रा(राजमुद्रा) सातारच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. ही राजमुद्रा सोन्याची असून अष्टकोनी आहे. राजमुद्रेवर लेख हा संस्कृत भाषेत आहे. सुरुवातीला सूर्य चंद्र ही प्रतीके दर्शविली आहेत. ही राजमुद्रा सातारच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात इतिहास प्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले) यांच्यानंतर १८३९ ते १८४८ गादीवर असलेल्या छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज हे अजूनही समाजाला अनभिज्ञ आहेत. त्यांचे योगदानही समाजाला माहीत नाही. त्यांचे छायाचित्र अथवा पुतळेही कुठे दिसत नाही. मात्र त्यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी केलेली कामे पाहता ते किती प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते याची प्रचिती येते. साताऱ्यातल्या दळणवळणासाठी मोठ्या ओढ्यांवर त्यावेळी त्यांनी मोठे पूल बांधले होते. हे आजही शहरातील करंजे भागात भक्कम स्थितीत आहेत. राज्याभिषेकाच्या वेळी आप्पासाहेब यांनी छत्रपती शहाजी हे नाव स्वीकारले होते. त्यावेळी त्यांनी ही राजमुद्रा प्रसिद्ध केली होती.
आणखी वाचा-साताऱ्यात महाबळेश्वर, माण, खटावसह सर्वदूर पाऊस
या राजमुद्रेवर ‘श्री स्वस्तिश्री शिवसंप्राप्त श्रिय: श्री शाह जन्मन: श्रीमच्छाहाजिराजस्य श्रीमुद्रेय विराजते’ असा मजकूर आहे. मात्र हे राजमुद्रा शिक्का उठविलेले पत्र अगर एखादा दस्तावेज इतिहासात अद्यापही उपलब्ध झालेला नाही.
कृष्णा नदीच्या काठावर संगम माहुली (सातारा) येथे महाराणी येसूबाई यांच्या समाधीपुढे जाणाऱ्या रस्त्यावर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांची समाधी आहे. त्यावरील राजचिन्हे आणि भव्यता आजही दिसून येते. संग्रहालयात छत्रपती शहाजी महाराज तख्तावर (गादी) बसलेले चित्र (मोर्चेल) आणि तख्त संग्रहालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
आणखी वाचा-विठ्ठलाच्या पूजेसाठी १ पासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सोय; पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित
सातारा शहरात लाकडी बांधकाम असलेल्या भव्यदिव्य राजवाडा हे सातारचे एक वैशिष्ट्य आहे. राजवाड्यात असलेली चित्रे, मराठा आर्ट गॅलरी म्हणून वापर झालेले दालन आणि भव्य दरबार हॉल आणि एकूणच राजवाड्याची भव्यता या सर्व बाबी मराठीशाहीच्या राजधानीचे वैभव अधोरेखित करतात. हा राजवाडा छत्रपती आप्पासाहेब महाराजांनी उभारल्याचा उल्लेख आहे. सातारा शहराच्या भव्यतेला त्यांनी मोठा आयाम दिला. त्यांच्या अनेक वस्तू संग्रहालयात अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. -प्रवीण शिंदे, अभिरक्षक, सातारा संग्रहालय.