राज्यात सर्वत्र सोन्याचे भाव झपाटय़ाने खाली येत असताना ‘सुवर्ण नगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये मात्र सोन्याच्या दरात विशेष फरक पडलेला नाही. इतर शहरांच्या तुलनेत येथे सोन्याचे भाव अधिकच आहेत. येथील सोन्याच्या शुद्धतेची ख्याती हे कारण यासाठी व्यापाऱ्यांकडून दिले जात आहे. सोन्याचे दर आठ-दहा दिवसात पुन्हा उसळी घेतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
सोन्याचे भाव ३३ हजारापर्यंत गेले असतानाही येथील सराफी पेढय़ांवरील ग्राहकांची गर्दी कमी झालेली नव्हती. गेल्या आठवठय़ापासून दररोज भाव घसरत असताना इतर शहरांच्या तुलनेत येथील भाव ८०० ते १००० रूपये अधिक असल्याबद्दल ग्राहक संभ्रमात आहेत. राजमल लखीचंद, आर. सी. बाफना व महावीर ज्वेलर्स यांच्याकडून येथील सोन्याची शुध्दता सर्वदूर प्रसिध्द असणे हे दरातील तफावतीचे कारण दिले गेले. याशिवाय विविध स्थानिक कर, दागिन्यांचे विविध प्रकार व त्यांच्या घडवणुकीच्या मजुरीचाही दरावर फरक पडतो.

Story img Loader