पोटाची भूक ही माणसाच्या मूलभूत गरजेपकी एक. ही भूक भागविण्यासाठी निसर्गाने व्यवस्थाही केली आहे. मात्र महादेवाच्या डोंगररागांत विखुरलेल्या माणदेशात वर्षांनुवर्षांच्या दुष्काळात निसर्गाने तशी काही सोय न केल्याचेच दिसते. पण मग या निसर्गाला दोष देत इथेच खुरडत जगण्यापेक्षा काही हालचाल करण्यासाठी या माणदेशीच्या अनेक तरुणांनी कित्येक वर्षांपूर्वीच स्थलांतर करत पोट भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच मग हा प्रदेश आणि गलाई उद्योगाचे एक नाते तयार झाले. सोन्याला झळाळी देतादेता आज या शेकडो घरांनाच जणू उजाळा मिळाला आहे. विटा-खानापूर परिसरातील पारे, वेजेगाव, साळसिंग, देवेिखडी, वाळूज, वासुंबे, लेंगरे, बलवडी, घोटी या गावांमध्ये फिरू लागलो, की या ‘सुवर्णझळाळी’चीच कथा सर्वत्र ऐकण्यास मिळते.

[jwplayer poPcqTHM]

गलाई व्यवसाय म्हणजे सोन्याचे शुध्दीकरण. हा धातू गाळत तो शुद्ध करणे. खरेतर सोने हे शुध्दच असते मग त्याचे पुन्हा शुध्दीकरण कशासाठी असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सोन्याच्या व्यवसायात जशी नवे सोने खरेदी-विक्री चालते तसेच जुने दागिने वितळवूनही पुन्हा नवे सोने तयार केले जाते. हे  सोने गाळून शुद्ध करण्याचा व्यवसाय म्हणजे गलाई उद्योग. आज देशभरात सुरू असलेल्या या व्यवसायात माणदेशी हात मोठय़ा संख्येने गुंतलेले आहेत आणि त्यांनी आपला विस्तार केरळ, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, पंजाबपासून थेट ओरिसा, पश्चिम बंगालपर्यंत केलेला आहे. कोची, सेलम, एर्नाकुलम, चेन्नई, कोलकाता, आग्रा, मेरठ, आसनसोल, भडोच अशा अनेक शहरांतील गलाई व्यवसाय करणारे जर शोधले तर तिथे मराठी माणसे सापडतील आणि त्यांच्या मूळ गावांचा शोध घेतला तर माणदेशात त्यांची पाळेमुळे सापडतील.

भारतीय महिलांना सुवर्णालंकाराची मोठी हौस आहे. या हौसेला मोल नाही. यामुळे निव्वळ धातूच्या वळय़ा किंवा बिस्किटांच्या रूपात खरेदी करण्यापेक्षा दागिन्यांमध्ये सोने खरेदी करण्याकडे भारतीयांचा सुरुवातीपासूनच मोठा कल आहे. हौस, परंपरा किंवा गुंतवणूक म्हणून असे दागिने विकत घ्यायचे आणि मग नवा करताना किंवा आर्थिक अडचणीवेळी ते विकायचे ही आपल्याकडची सहज पद्धत आहे. आता अशा खरेदी विक्रीच्या वेळी त्या दागिन्यातील शुद्ध सोन्याचा अंश तपासावा लागतो. या गरजेतूनच गलाई उद्योग जन्माला आला आणि आज देशभर सराफी व्यवसायाच्या जोडीने तो सर्वत्र विस्तारलाही गेला आहे. आज या उद्योगात माणदेशीच्या कारागिरांची तिसरी पिढी स्थिरावली आहे.

वर्षांनुवर्षीच्या दुष्काळात पोट भरण्यासाठी माणदेशातून आजवर अनेकांनी स्थलांतर केले. नवनवे उद्योग, व्यवसाय आत्मसात केले. यातच या सोने गाळण्याच्या, शुद्ध करण्याच्या व्यवसायातही त्यांनी आपले बस्तान बसवले आहे. या भागात फिरून माहिती घेतल्यावर असे समजते, की ही मंडळी सर्वात अगोदर दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू या राज्यात गेली. तिथे रोजगाराचा शोध सुरू असतानाच त्यांना या प्रकारच्या कामाची संधी मिळाली. त्यांनी हे तंत्र शिकून घेतले. कधी तीन पिढय़ा अगोदर पडलेले हे पहिले पाऊल. मग त्यावर पाय ठेवत या भागातील अनेक तरुणांनी या व्यवसायात उडी घेतली.

दागिना तयार करत असताना सोन्याचा नाजूकपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये तांबे, पितळ, चांदी आदी अन्य धातूंचा समावेश करावा लागतो. मग हे दागिने पुन्हा मोडीसाठी आल्यावर त्यातील निव्वळ सोने आणि अन्य धातू वेगळे करावे लागतात. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. यासाठी दागिने भट्टीत घालून जाळावे लागतात. या प्रक्रियेत सोन्याचे द्रव्यात रूपांतर करायचे असते. हे करेपयर्ंत अन्य धातू आपसूक जळून जातात. यानंतर मग तावून सुलाखून मुसीत उरते ते केवळ शुध्द २४ कॅरेटचे चोख सोने. हे शुध्द सोने पुन्हा दागिने निर्मितीसाठी वापरता येते.

या रासायनिक प्रक्रियेत प्रामुख्याने अ‍ॅसिडबरोबरच सायनाईडसारख्या विषारी द्रव्याचा वापर करावा लागतो. या घातक पदार्थाबरोबर सततचा संपर्क बऱ्याच वेळेला जीवावर बेतणारा असल्याने आजवर स्थानिक लोकांनी या व्यवसायापासून दूर राहणे पसंत केले. पण पोटाच्या खळगीपुढे मग माणदेशीच्या या माणसांनी तो आत्मसात केला आणि आज तो त्यांचा परंपरागत उद्योग बनला आहे.

यातील पारे (ता. खानापूर) हे या व्यवसायातील प्रमुख गाव. विटय़ापासून ९ किलोमीटरवर हे गाव. पाच हजार लोकवस्ती. या गावात गेलो, तर गावाभोवती सर्वत्र आजही दुष्काळच दिसतो. निव्वळ माळ असलेले डोंगर. कोरडी शेती. त्यावर चरत असलेल्या शेळय़ा – मेंढय़ा. पाऊसकाळी एखादे पीक देणारी शेती. पाण्यासाठी दाही दिशा हिंडणारे लोक. पण हा दुष्काळ पाहात गावात शिरावे तर गावात सर्वत्र टोलेजंग इमारती आढळतात. या अशा परस्परविरोधी दृश्यामागचे कारण या लोकांच्या स्थलांतरामध्ये आणि त्यांनी अंगीकारलेल्या गलाई व्यवसायात आहे.

पारेबरोबरच विटा खानापूर परिससरातील वेजेगाव, साळसिंग, देवेिखडी, वाळूज, वासुंबे, लेंगरे, बलवडी, घोटी या प्रत्येकच गावात हे दृश्य दिसते. इथे घरटी कुणी ना कुणी या व्यवसायात देशभरात कुठेतरी स्थिरावलेला आहे. यामुळे गावातील अनेक घरांमध्ये केवळ वयस्कर माणसेच शिल्लक राहिलेली दिसतात. अनेकांची घरे बंद अवस्थेतच दिसतात. व्यवसायासाठी सारे घरच मुलुखगिरीवर गेलेले असते.

हा व्यवसाय काही महाराष्ट्रात करायचा नाही. यामुळे इथे केवळ त्यातील तंत्र शिकून चालणार नव्हते. मग या मंडळीनी त्यावरही मात करत परराज्यांच्या भाषा आत्मसात केल्या. यामुळे या गावांमधील अनेकांना आज तमिळ, तेलगू, मल्याळी, कन्नड, पंजाबी अशा परप्रांतीय भाषाही येतात. अनेकांनी तर त्यांची लिपीही आत्मसात केली आहे. दुसऱ्यांची भाषा – लिपी शिकण्याबरोबर त्यांच्या संस्कृतीचेही धागेदोरे आता या कुटुंबांमध्ये मिसळले आहेत. त्यांचे पेहराव, आहार संस्कृती बदलली आहे. अनेकांनी आता मूळ माणदेशी एक घर तर कामाच्या ठिकाणी परराज्यात दुसरे असा दुहेरी संसार मांडला आहे.

अनेक घरातील कर्ता पुरुष परराज्यात तर आई, वडील, अन्य भाऊ, त्याचे स्वत:चे कुटुंब हे या माणदेशी नांदत असते. मग महिन्याकाठी तिकडे काम करायचे आणि त्यातून आलेला पैसा गावी पाठवायचा हा नित्यक्रम सुरू असतो. पोटाची भूक भागवता भागवता त्यांनी आज त्यांचे आणि त्याबरोबर गावाचेही राहणीमान सुधारले आहे. भवताली सर्वत्र दुष्काळी चित्र असताना या गलाई उद्योजकांच्या गावात मात्र आर्थिक स्थिरता आणि सुबत्ता दिसते. चार ते पाच हजार लोकवस्तींच्या या खेडय़ांभोवती पवनचक्क्यांची पाती गरगरताना दिसतात. गावांमध्ये शाळा उभ्या राहिल्या आहेत. टुमदार घरे दिसतात. दारापुढे एखादे वाहन उभे असलेले दिसते. घरात सर्व सुखसुविधा आढळतात आणि कुठलेही शिक्षण नसताना घरातील कर्ता पुरूष ‘शेट’ ही पदवी मिरवत असतो. हे सारे परिवर्तन पोटाच्या शोधार्थ अंगीकारलेल्या गलाई उद्योगात सापडते. या एका उद्योगावर इथली अनेक गावे आणि त्या गावातील असंख्य घरे सध्या जगत आहेत.

परराज्यात मराठी संस्कृती

मुलुखगिरी करताना या गलाई बांधवानी आपल्याबरोबर आपली संस्कृतीही नेली आहे. या समाजाकडून परराज्यात गणेशोत्सव आणि शिवजयंती मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाते. या निमित्ताने दोन-चार जिल्ह्यांत विखुरलेले माणदेशी बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात.

[jwplayer bZoVXId4]

Story img Loader