शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण नसणारी मंडळी आज सत्तेवर असल्याने राज्य कारभाराचे वाटोळे झाले असून, बळीराजाला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परिणामी अच्छे दिन येण्याऐवजी बुरे दिन आले आहेत. अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी निमसोड (ता. खटाव) येथे केली.
आमदार व माजी पालमंत्री शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर मार्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, प्रा. अर्जुनराव खाडे, सभापती कल्पानाताई मोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत तर पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा कळवळा नाही, दरम्यान, आमच्या विकासकामांचे श्रेय दुसरेच घेत आहेत. कुणीही येतोय अन् नारळ फोडतोय, असा आमदार जयकुमार गोरे यांना चिमटा काढून, पवार पुढे म्हणाले, की दुधाचे दर न दिल्याने शेतकऱ्याचा कणा मोडला आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत तर या जिल्ह्याचे पालकमंत्री बाहेरचे असल्याने जनेतेबद्दल कळवळा दिसून येत नाही. शेतक ऱ्यांच्या विरोधी निर्णय घेणारे हे शासन आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा शब्द दिला. मात्र, टोलनाक्यांची संख्या वाढू लागली आहे. कामगारांविरोधी निर्णय घेतल्याने राज्यात मंदीचे सावट सावट आहे. पिण्याच्या पाणी योजना, पंतप्रधान सडक योजनांना निधी देण्याचे बंद केल्याने ग्रामीण भागाच्या विकासाची कोंडी केली आहे. साताऱ्याला मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी हे प्रशासन प्रयत्न करीत नाही. नवीन अधिग्रहण कायद्याने भाडवलदारांचे हित जोपासण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत. आम्ही सुरू केलेल्या अभियानाची नावे बदलून नवीन अभियान राबविण्याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे. भाजपा-सेनेच्या हातामध्ये सत्ता दिली ही जनतेने मोठी चूक केली आहे. निमसोड येथील नळपाणी योजना राष्ट्रवादीने मंजूर केली असताना कोणीही येतो व नारळ फोडतो. ही बाब चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
शशिकांत शिंदे म्हणाले, की दुष्काळी खटाव-माणच्या पाणी योजना अपूर्ण ठेवून शासनाकडून अन्याय सुरू आहे. दुष्काळी भागातील सिंचन योजनांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. आपण चुकीचे नारळ आपण कधीही फोडत नाही.

Story img Loader