पोलिसांच्या बरोबरीने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड्स महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण गेल्या काही काळापासून होमगार्ड्सचे मानधन वाढविण्यासंदर्भात वारंवार मागणी केली जात होती. आज अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली असून मानधनात दुप्पट वाढ केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५,००० होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दि. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३८ महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील होमगार्ड यांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. होमगार्ड यांच्याबरोबरच कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, तसेच अनुकंपा धोरणाही लागू करण्यात येणार, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले गेले.
९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाची प्रत देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर शेअर केली आहे. शासन निर्णयात होमगार्डची स्थापना आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. “होमगार्ड संघटनेची स्थापना दि. ६ डिसेंबर १९४६ रोजी झाली. सदर संघटनेत स्वतःचा व्यवसाय व नोकरी सांभाळून स्वयंस्फुर्तीने देशसेवा करण्याच्या उद्देशाने नागरिकांची मानसेवी स्वरुपात होमगार्ड स्वयंसेवक म्हणून भरती करुन घेण्यात येते. कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तींमध्ये पोलिसांना सहाय्य करणे, तसेच संप काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास सहाय्य करणे, ही होमगार्ड स्वयंसवेकांची प्रमुख कर्तव्य आहेत.”